'एआय'ने बनविलेली प्रतिमा
महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्राचा आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा २८ जून रोजी घेण्याची घोषणा केली आहे. या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्राने विरोध केला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा २८ जून रोजी घेण्याची घोषणा केली आहे. या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्राने विरोध केला आहे. मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बहुतांश मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ? असा सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा केंद्राने दिला आहे.

राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २० मे देण्यात आली आहे. या परीक्षेलाच आता मराठी अभ्यास केंद्राने आव्हान दिले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही. तसेच राज्यात हिंदी साक्षरतेचे प्रमाणही प्रचंड असल्याने या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे. मराठी माणसाला हिंदीतून कामचलाऊ व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही. असे असतानाही हिंदी परीक्षेची अट का असा सवाल केंद्राने उपस्थित केला आहे.

तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का? गुजरात किंवा पश्चिम बंगालमध्ये अशी परीक्षा होते काय? की महाराष्ट्र सरकारने स्वतःहूनच हिंदीच्या परीक्षेचे हे लोढणे मराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात अडकवले आहे? असा संतप्त सवाल मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ.दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे.

अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या मराठीच्या ज्ञानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनावश्यक हिंदी परीक्षा घेऊन शासन वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग