कराड : कायम दुष्काळ, उन्हाळा आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती यांच्याशी झुंजणाऱ्या माणदेशाच्या मातीत जैवविविधतेचा अनमोल ठेवा दडलाय. याच जैवविविधतेतील अन्नसाखळीचा महत्त्वाचा दुवा आणि निसर्गाचा महत्वाचा ‘स्वच्छतादूत’ असलेल्या तरसाच्या संवर्धनासाठी माण तालुक्यातील ‘किरकसाल’ गाव परिसरात सुरू असलेल्या प्रयत्नांना आता जागतिक व्यासपीठ मिळाले आहे. विशेष म्हणजे, तरसाची शास्त्रीय पद्धतीने गणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून ‘किरकसाल’ गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरस हा केवळ शिकारी प्राणी नसून निसर्गाचा ‘स्वच्छतादूत’ म्हणूनही त्याची भूमिका महत्त्वाची आहे. मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन तो परिसर स्वच्छ ठेवतो आणि रोगकारक घटकांचा प्रसार रोखण्यास हातभार लावतो.त्यामुळे एखाद्या परिसरात तरसाचे अस्तित्व असणे ही तेथील नैसर्गिक परिसंस्था सक्षम असल्याची खूण मानली जाते.
माणदेशातून थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर किरकसाल परिसरातील या संवर्धन कार्याची दखल घेत युवा वन्यजीव संशोधक चिन्मय सावंत यांची ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या (आययुसीएन) तरस विशेष गटासाठी सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे माणदेशातील स्थानिक पातळीवरील संवर्धन चळवळीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे.
वाघ आणि बिबट्यांच्या धर्तीवर तरसाचीही शास्त्रीय पद्धतीने गणना व्हावी, या उद्देशाने करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ‘किरकसाल’ गावाला राज्यात आगळी-वेगळी ओळख मिळाली आहे. या माध्यमातून तरसासह परिसरातील विविध वन्यजीवांच्या अधिवासाचे दस्तऐवजीकरण केले जात असून, स्थानिक समाज आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्व अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
तरसाच्या संवर्धनाची गरज वाढली
तरस हा जमिनीवरील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून सर्वोच्च शिकाऱ्यांपैकी एक मानला जातो. मृत प्राण्यांच्या अवशेषांपासून कातडी व हाडांपर्यंतचे भाग खाण्याची त्याची क्षमता आहे. त्याची शक्तिशाली पचनसंस्था कठीण हाडांचेही विघटन करू शकते. मृत प्राण्यांचे अवशेष नष्ट केल्याने परिसरातील रोगकारक घटकांचा प्रसार कमी होण्यास मदत होते.अन्नसाखळीतील त्याच्या स्थानामुळे इतर वन्यजीव व शाकाहारी प्राण्यांच्या संख्येवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. अधिवासाचा ऱ्हास आणि अन्य मानवी हस्तक्षेपांमुळे तरसाच्या संवर्धनाची गरज वाढली आहे. याचे महत्व ओळखून किरकसाल गावाने तरसाची शास्त्रीय गणना करण्याचा निर्णय घेत तो तडीस नेला. त्यामुळे तरस गणना करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव होण्याचा मान या गावाने पटकावला.
संवर्धन कार्याला जागतिक मान्यता : चिन्मय सावंत
ही संधी जागतिक स्तरावर तरस संवर्धनासाठी योगदान देण्याबरोबरच माणदेशातील ग्रामीण तरुणांच्या संवर्धन प्रयत्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या संवर्धन कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे, हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया युवा वन्यजीव संशोधक व ‘आययुसीएन’ तरस विशेष गटाचे सदस्य चिन्मय सावंत यांनी व्यक्त केली आहे.
जैवविविधता संवर्धनाचे ‘किरकसाल’ प्रभावी मॉडेल
माणदेशातील तरस संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न हे केवळ एका गावापुरते मर्यादित न राहता ग्रामीण सहभागातून जैवविविधता संवर्धनाचे प्रभावी मॉडेल ठरण्याची शक्यता आहे. किरकसाल गावाने दाखवलेली तरस संवर्धनाची नवी वाट आता अधिक मळली जात असून माणदेशातील गवताळ व खुल्या नैसर्गिक परिसंस्थेचे महत्त्व ओळखून किरकसाल परिसरात ग्रामस्थ, जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि वन्यजीव अभ्यासकांच्या सहभागातून तरस संवर्धनाचे काम सुरू आहे.