सोलापूर : भाजपचे नेते तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू आणि खडी क्रशरबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसे दुर्लक्ष करा, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक आहेत, असे विधान विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पूर्वी शनिवारी एक चित्रपट लागायचा. तेव्हा चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. मी १९७५ ला मॅट्रीक पास झालो. तेव्हा चित्रपट पाहण्याचा वेगळा आनंद असायचा. आता चित्रपट पाहण्यासाठी कोणी मांडी घालून बसणार का, आता तंत्रज्ञान बदलले आहे. खरे तर आपण एखाद्या दिवशी आनंदाच्या विश्वात गेले पाहिजे. अन्यथा दररोज तेच-तेच हा गेला, तो आला; अन्यथा वाळूचा ट्रक पकडला असे ऐकावे लागते. आपली जिल्हा परिषद आहे त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत. सोलापूर यासाठी फार प्रसिद्ध आहे. मी मागे एकदा जिल्हाधिकाऱ्यांना म्हटले होते की, दुर्लक्ष करा थोडसे. गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच त्यांच्या विधानावर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. विखे पाटील यांनी हे विधान केले तेव्हा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आदी महत्त्वाचे नेते देखील व्यासपीठावर होते. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे.
टीकेनंतर विखे-पाटील यांची सारवासारव
तुम्ही सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका, काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या घोरणांबाबत आम्ही अतिशय कडक राहिलो आहोत, धोरणाची अंमलबजावणी करताना कुठेही कसूर केलेला नाही. प्रसंगी आम्ही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली, नदीतून वाळू काढण्याला माझा कायमच विरोध राहिलेला आहे, अशी सारवासारव राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.