महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आता ५० टक्क्यावरून ५३ टक्के करण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे. विशेष म्हणजे जुलै २०२४ पासून तो लागू करण्यात येणार आहे. जुलै २०२४ पासून ते जानेवारी २०२५ पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता हा थकबाकीच्या रूपात देण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै २०२४ पासून ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे १ जुलै २०२४ पासून ३ टक्के महागाई भत्ता वाढ, घरभाडे भत्ता वाढ तसेच तद्नुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा, अशी अधिकारी महासंघाने राज्य शासनाकडे वेळोवेळी आग्रही मागणी केली होती.

महासंघाच्या मागणीची दखल घेत राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्तांना १ जुलै २०२४ पासून ३ टक्के महागाई भत्ता वाढ, घरभाडे भत्ता वाढ तसेच तद्नुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग. दि. कुलथे यांनी आभार मानले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग १० पदरी होणार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अजितदादांनी जपली विचारधारा! तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले

बँक खात्यात ४ नॉमिनी ठेवता येणार; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी