संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीचे संकेत; महाविकास आघाडी, शरद पवार यांनाच दणका

विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वीचा उपांत्य सामना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे शुक्रवारी जाहीर झालेले निकाल हे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांच्यासाठी...

Swapnil S

रोहित चंदावरकर

मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वीचा उपांत्य सामना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे शुक्रवारी जाहीर झालेले निकाल हे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांच्यासाठी फारच निराशाजनक असल्याचा अर्थ काढण्यात येत आहे.

सत्तारूढ महायुतीमधील मते फुटतील अशी अटकळ बांधली जात होती, मात्र त्यांची मते फुटली नाहीत. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही आमदार शरद पवार यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराला मतदान करतील, असे नेते आणि निरीक्षकांचे म्हणणे होते, मात्र तसेही घडले नाही. अजित पवार यांच्या दोन्ही उमेदवारांना २३ हून अधिक मते मिळाली आणि ते विजयी झाले. शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील हे या निवडणुकीत पराभूत झाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सर्वच पक्ष आणि दिल्लीतील नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष होते. भाजपचे उमेदवार त्यांच्याकडील १०३ मते आणि आघाडीतील अन्य सदस्यांमुळे सुरक्षित होते. त्यामुळे अजित पवार गटाच्या दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार धोक्यात असल्याचा संशय होता. अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे अजित पवार यांचा एक उमेदवार धोक्यात असल्याची चर्चा होती. आपल्या उमेदवाराला मतदान करून एकनिष्ठता सिद्ध करावी, असे शरद पवार यांनी या पाच आमदारांना सांगितले होते, असे कळते. मात्र ते प्रत्यक्षात उतरले नाही. विरोधकांच्या आघाडीतूनच मते फुटली, असे काही निरीक्षकांना वाटत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरविले आणि त्यामुळेच लढत झाली, अन्यथा निवडणूक बिनविरोध झाली असती. मिलिंद नार्वेकर हे विजयासाठी आवश्यक असलेल्या कमीत कमी मतांनी निवडून आले.

महायुती एकत्र आहे हे या निवडणुकीवरून स्पष्ट झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर सांगितले. महायुतीमधील तीनही पक्षांनी एकमेकांना मदत केली आणि ते एकत्र राहिले. तर एकमेकांचा पराभव कसा करता येऊ शकेल याकडे महाविकास आघाडीचे लक्ष होते, असेही शिंदे म्हणाले.

महायुतीला काहीसा दिलासा

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होता, मात्र विधानपरिषद निवडणूक निकालाने महायुतीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आम्हाला विजयाची खात्री होती, मते फुटणार असल्याच्या अफवा पसरत होत्या, मात्र तसे काही झाले नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी