मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणानंतर पक्षाची पुढील वाटचाल कशी राहील याची योजना शरद पवार आणि अजित पवार यांनी आखली होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून दूर करून त्यांच्या जागी ओबीसी चेहरा म्हणून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची निवड केली जाणार होती. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचा केंद्रीय तर जयंत पाटील, रोहित पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याची योजना होती, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सूत्रांनी मंगळवारी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फोडले. माजी मंत्री जयंत पाटील आणि राजेश टोपे या दोघांनी विलीनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती, असा दावा केला आहे. सध्या सुरु असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर म्हणजे १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती, असेही बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट अजित पवार यांच्या गटात विलीन होणार होता. या विलीनीकरणाला भाजपने हिरवा कंदील दाखवला होता. विलीनीकारणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होणार होता.
विलीनीकरणानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार होते. तर राज्य मंत्रिमंडळात जयंत पाटील यांचा कॅबिनेट आणि रोहित पवार यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्याचे निश्चित झाले होते.
एकत्रित राष्ट्रवादीची औपचारिक सूत्रे शरद पवार यांच्याकडे राहणार होती. मात्र, प्रत्यक्षात अजित पवार हेच पक्षाचा कारभार पाहतील, असे निश्चित झाले होते. तसेच पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे यांचे नाव जवळपास अंतिम करण्यात आले होते. परंतु, अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.