जळगाव : चोपडा तालुक्यातील गणपूर येथे अनेर नदीत बुडत असलेल्या चौघा मुलांचे प्राण एका १४ वर्षीय मुलाने वाचवून धाडसाचे उदाहरण घालून दिले आहे. उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील या मुलाने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेत चौघांना सुरक्षित बाहेर काढले. त्याच्या या पराक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत आहे.
गणपूर (ता. चोपडा) येथील अनेर नदीत चार अल्पवयीन मुले आंघोळीसाठी उतरली होती. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ती अचानक खोल पाण्यात जाऊन बुडू लागली. त्याचवेळी तेथून जात असलेल्या ओम पाटीलने प्रसंगावधान राखत तत्काळ नदीत उडी घेतली आणि एकामागून एक अशा चारही मुलांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
या घटनेत ओम त्या मुलांसाठी खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरला. ओम पाटील हा गावातील विकास विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील व आई सारलाबाई पाटील हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणींमुळे ओमला शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, ओमच्या या धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ओमच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. हा खर्च जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड तसेच भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे. ओम पाटीलच्या या धाडसामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची गरज अधिक आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी आम्ही नेहमीच मदतीचा हात देत आलो आहोत.अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड