जळगाव : कापसाचा सर्वाधिक पेरा होणारा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याचा लौकिक असला तरी यंदा पावसाचा पडलेला मोठा खंड आणि त्यातून दुष्काळाचा फटका कापसाला बसणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा जळगाव जिल्ह्यात कोरडवाहू कापसाच्या उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पांढरे सोने आणि जळगावच्या अर्थकारणावर परिणाम करणारे कापसाचे हे पीक आहे. राज्यात सर्वाधिक कापसाचा पेरा हा जळगाव जिल्ह्यात होतो. जळगावमध्ये दरवर्षी किमान साडेपाच लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड होत असली तरी यंदा कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस पेरण्याकडे पाठ फिरवली आणि ४ लाख ३५ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड झााली. मध्यंतरी चांगला झाालेला पाऊस पाहता, कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र महिनाभरापेक्षा जास्त मोठा पावसाचा खंड पडला आणि शेतकऱ्यांच्या आशेवरही पाणी फेरले. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, कापूस उत्पादनात ५० ते ६० टक्के घट होण्याची शक्यता आहे.
कारखाने एकाच शिफ्टमध्ये चालणार
विशेषत: जेव्हा १५ लाख गाठींचे कापसाचे उत्पादन होत असते, त्यावेळेस जिनिंग कारखाने हे तीन शिप्टमध्ये चालवले जातात. यंदा ८ ते ९ लाख गाठींचे उत्पादन झाल्यास ते एकाच शिप्टमध्ये चालवावे लागतील. कपाशीच्या बिया म्हणजेच सरकी कमी उपलब्ध झाल्याने त्यापासून निघणाऱ्या तेल उत्पादनावरही परिणाम होईल. या सर्वांचा फटका एकंदरीत रोजगारावर होईल, अशी भीती खान्देश जिनिंग कारखानदार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी व्यक्त केली.
गुजरातमध्ये होणारी अवैध वाहतूक रोखणार
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होत असले तरी गुजरातमधील जिनिंग कारखान्यांसाठी येथील कापसाची मोठ्या प्रमाणावर अवैध मार्गाने वाहतूक होते. ही वाहतूक रोखण्यात यश आले नाही तर त्याचादेखील फटका येथील कारखान्यांना बसतो, याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरात नेहमीपेक्षा कमी कापूस येणार असून यंदा कापसाला काय भाव मिळतो, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विविध गावांमध्ये पीक पाहणी
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांची सद्यस्थिती व उत्पादनक्षमतेचा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष आढावा घेत विविध गावांमध्ये पीक पाहणी केली. खान्देशात कापसाचे क्षेत्र मोठे असल्याने कापसावर जिनिंग आणि प्रेसिंग करणाऱ्या कारखान्यांची संख्या १५० वर आहे. येथील जमिनीत उत्पादित होणाऱ्या कापसाचे एक वेगळेपण आहे. त्यामुळे त्यास मोठी मागणी असते. या कारखान्यातून हजारो कामगारांना रोजगार मिळत असतो. त्यातून कररूपाने शासनास उत्पन्न मिळत असते. सर्वसाधारणपणे १५ लाख गाठींचे उत्पादन दरवर्षी होत असतांना, गेल्या वर्षी दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने उत्पादन घटून ते ११ लाख गाठींपर्यंत आले. यंदा दुष्काळामुळे कापसाचे उत्पादनात ५० टक्के घट अपेक्षित धरली तरी ८ ते ९ लाख गाठींचे उत्पादन यावे, अशी अपेक्षा खान्देश जिनिंग प्रेसिंग कारखानदार संघाचे सेक्रेटरी अविनाश काबरा यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केली.