प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत  
महाराष्ट्र

प्राणी गणनेत जळगाव जिल्ह्यात तीन वाघांचे दर्शन; वढोदा-चारठाणा परिसरातील 'बनाना टायगर' क्षेत्र पुन्हा चर्चेत

जळगाव जिल्ह्यातील जंगल परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, बुद्ध पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या प्राणी गणनेत तीन वाघांची नोंद झाली आहे. जळगाव वनविभागाच्या वढोदा-चारठाणा परिसरात ही नोंद झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Swapnil S

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जंगल परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, बुद्ध पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या प्राणी गणनेत तीन वाघांची नोंद झाली आहे. जळगाव वनविभागाच्या वढोदा-चारठाणा परिसरात ही नोंद झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केळीच्या बागांमुळे प्रसिद्ध असलेला हा परिसर ‘बनाना टायगर’ म्हणूनही ओळखला जातो.

१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जळगाव वनविभाग आणि यावल वनविभागात प्राणी गणना मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी वढोदा-चारठाणा परिसरात तीन वाघांचे अस्तित्व आढळून आले. या भागात दाट जंगल, मुबलक पाण्याची उपलब्धता आणि विस्तीर्ण केळीची शेती असल्यामुळे वाघांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण झाला आहे. या परिसरात वाघांचे प्रजननही होत असल्याचे सांगितले जाते.

स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा केळीच्या बागांमध्ये वाघांना विसावलेले पाहिल्याचे सांगितले आहे. या परिसरात सहा ते सात वाघ असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात असताना बुद्ध पौर्णिमेच्या गणनेत तीन वाघांची अधिकृत नोंद झाल्याने त्याला शासकीय दुजोरा मिळाला आहे. मात्र, या वाघांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये जळगाव वनविभाग कमी पडत असल्याची चर्चा होत आहे. विशेषतः जळगावमध्ये उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचत असताना वन्यप्राण्यांसाठी किती पाणवठे तयार करण्यात आले आहेत, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

पाच बिबट्यांसह ५८२ वन्यप्राण्यांची नोंद

जळगाव वनविभागाच्या प्राणी गणनेत पाच बिबट्यांचीही नोंद झाली आहे. याशिवाय अस्वल, लांडगा, तडस, काळवीट, चिंकारा आदींसह एकूण ५८२ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. दरम्यान, जळगाव जिल्हा जळगाव आणि यावल अशा दोन वनविभागांत विभागलेला आहे. यावल वनविभागात सातपुडा पर्वतरांगांचा समावेश असून, सुमारे १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. जैवविविधता आणि समृद्ध वन्यजीवन हे सातपुड्याचे वैशिष्ट्य असल्याचे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरीष सहाय यांनी सांगितले.

वनविभागात २९९ प्राण्यांची नोंद

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी सातपुड्यात सात पाणवठे तयार करण्यात आले असून, गरज भासल्यास ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बुद्ध पौर्णिमेला ४२ मचाणांवर बसून करण्यात आलेल्या प्राणी गणनेत यावल वनविभागात २९९ प्राण्यांची नोंद झाली. यात रानडुक्कर, अस्वल, चितळ, नीलगाय, हरीण, ससा आणि बिबट्यांचा समावेश होता. मात्र, या भागात वाघाचे दर्शन झाले नसल्याची माहितीही उपवनसंरक्षक सौरीष सहाय यांनी दिली. सातपुड्यातील जंगल आणि वन्यजीवन संवर्धन हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता