Nashik : कालिका माता मंदिर २४ तास खुले राहणार; भाविकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध 
महाराष्ट्र

Nashik : कालिका माता मंदिर २४ तास खुले राहणार; भाविकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध

नाशिकच्या ग्रामदैवत कालिका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव (२२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर) दरम्यान भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहेत. संपूर्ण नवरात्र मंदिर २४ तास खुले राहील तसेच सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

Swapnil S

नाशिक : आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरामध्ये भाविकांसाठी संपूर्ण नवरात्रभर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण नवरात्र मंदिर २४ तास खुले राहणार आहे. तसेच या कालावधीत येणाऱ्या भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे.

मंदिर संस्थेचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी माहिती दिली की, या काळात हजारो नाशिककर भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. तसेच शेजारच्या धुळे, जळगाव, अहिल्यानगर येथील भाविकांचीही गर्दी असते. भाविकांना निष्कंटक दर्शन मिळावे यासाठी विविध यंत्रणांच्या मदतीने नियोजन केले जात आहे. यंदाचा उत्सव घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत सुरू राहणार आहे.तयारी आढावा बैठकीला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष नरुटे, मंदिर देवस्थानाचे सचिव प्रताप कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, विश्वस्त आबा पवार, दत्ता पाटील, किशोर कोठावळे आदी उपस्थित होते.

कालिका माता मंदिराच्या या सुव्यवस्थित व्यवस्थेने भाविकांना सुरक्षित आणि सुखद दर्शनाचा अनुभव मिळेल, असे संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

भाविकांचा विमा

कालिका माता मंदिरामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्व भाविकांचा दोन कोटींचा सामुहिक विमा काढण्यात येणार आहे. देवीच्या दागिन्यांसाठी एक कोटींचा विमा आणि सेवेकऱ्यांसाठीही विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे. दररोज पहाटे ३.३० वाजता काकडआरती आणि रात्री १२.३० वाजता महाआरती होईल.

६० सीसीटीव्ही कॅमेरे

गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिर संस्थेने स्वतःची सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे. महिला आणि पुरुष बाऊन्सर तैनात केले जातील. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल.

इतर सुविधा

  • नागरी सुरक्षा दल, होमगार्ड, पोलीस, अग्निशमन सेवा, जनरेटर २४ तास तैनात

  • परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी १०० स्वयंसेवक ठेवले जातील

  • आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारून रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध

  • 'देणगी दर्शन' सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार

  • दिव्यांग व वृद्ध भाविकांसाठी व्हीलचेअर सुविधा

  • परिसरातील दुकानदारांनी प्लास्टिकबंदी धोरणाचे पालन करणे अनिवार्य

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले

वळगणीच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; अवघ्या २० ते २५ दिवसांचीच उपलब्धता; बाजारात मोठी मागणी

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प