वृक्षतोडीविरोधातील आंदोलन तीव्र; ठाकरे सेनेची सोमवारी ‘कर्जत बंद’ची हाक, राज ठाकरे, जरांगे यांची साय डोंगरला भेट 
महाराष्ट्र

वृक्षतोडीविरोधातील आंदोलन तीव्र; ठाकरे सेनेची सोमवारी ‘कर्जत बंद’ची हाक, राज ठाकरे, जरांगे यांची साय डोंगरला भेट

कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट विद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीविरोधातील आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होत चालले आहे.

प्रतिनिधी

विजय मांडे

कर्जत : कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट विद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीविरोधातील आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी या परिसरात वृक्षारोपण करून सरकारचा निषेध केला, तर जरांगे यांनी वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने सोमवारी ‘कर्जत तालुका बंद’ची हाक दिली.

कर्जत तालुक्यात प्रस्तावित प्रकल्पासाठी होणाऱ्या जंगलतोडीच्या मुद्द्यावरून आता आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत येथे जंगलतोडीच्या परिसराची पाहणी करत स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

सह्याद्री हा केवळ एका समाजाचा किंवा एका पक्षाचा विषय नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कितीही राजकीय पक्षांना निधी दिला, तरी जनतेच्या हिताच्या विरोधात निर्णय घेता येणार नाही, असा टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सह्याद्रीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्व पक्षांनी आणि समाजघटकांनी एकत्र येण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. या वेळी स्थानिक मराठा समाजाचे नेत्यांसह अन्य ग्रामस्थांनी त्यांना जंगलतोडीच्या प्रश्नाची माहिती दिली.

पाणीटंचाई गंभीर

कर्जत तालुक्यातील जंगलतोडीचा प्रश्न आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित राहिलेला नसून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी या परिसराची पाहणी केली. सह्याद्रीच्या डोंगररांगांचे महत्त्व अधोरेखित करताना, "जंगलतोडीमुळे भविष्यात पाणीटंचाई आणि पर्यावरणीय संकट अधिक गंभीर होईल", अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

राजकीय पक्ष लक्ष्य

जंगलतोडीच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षांनाही लक्ष्य केले. "राजकीय पक्षांना निधी दिला जातो म्हणून जनतेच्या हिताविरोधात निर्णय घेण्याची मुभा मिळत नाही", असे सांगत त्यांनी राज्यातील आर्थिक परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील कथित हितसंबंधांवरही टीका केली. सह्याद्रीचे संरक्षण हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा जातीचा विषय नसून, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देवाच्या काठीचा आवाज नसतो...

'टोरंट ची वकिली करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा प्रश्न मला विचारायचे आहेत. त्यांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळणार आहेत काय, त्यात प्रामुख्याने वीज संपन्न महाराष्ट्र असताना आणखी तेरा हजार मेगावॉट वीज कशाला पाहिजे असा सवाल केला. हे सर्व एमएमआरमध्ये सुरू असून भविष्यात एमएमआर गुजरात राज्याला जोडायचे असून त्यांच्यासाठी हा सर्व खटाटोप कशासाठी, जगात नाकारलेली डेटा सेंटर महाराष्ट्र राज्यात कशासाठी? पंप स्टोरेज प्रकल्प झाल्यावर हा प्रकल्प जगातील मोठा प्रकल्प असणार आहे, मात्र याच प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज कोण वितरित करणार, कोणाला वितरीत करणार, असा प्रश्न असून या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वांनी राज्यातील सत्ताधारी यांना विचारायला हवा. महाराष्ट्र खासगी लोकांना द्यायचा असे अमित शहा यांनी ठरवले आहे. कुऱ्हाडीचा आवाज येतो पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. त्यामुळे त्यांची काठी ज्यावेळी पडेल त्यावेळी तुम्हाला जाग येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

सर्वांनी ‘बंद’ला पाठिंबा द्यावा

आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी २ नोव्हेंबर रोजी कर्जत तालुका बंदची हाक देण्यात येत आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी, व्यापारी संघटनांनी, नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महायुतीला ‘दे धक्का’! महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत

दिवाळी गोडवा! मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये बोनस; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

टाटा समूहाचा विध्वंस केला जातोय; राहुल गांधी यांचा मोदी, शहांवर अप्रत्यक्ष आरोप, सीतारामन यांचा पलटवार

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

मतदार यादीची शुद्धता हीच लोकशाहीची सुरक्षा