प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...  X
महाराष्ट्र

प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...

रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर निशाणा साधला होता.

Swapnil S

मुंबई : रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर निशाणा साधला होता. या वादावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया देत विरोधकांचा आरोप खोडून काढला आहे. ‘कर्जत पंप स्टोरेज हा संपूर्णपणे पर्यावरण पूरक प्रकल्प असून विरोधकांकडून केवळ फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यातील सायडोंगर-१ आणि परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित ३,००० मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प किती फायद्याचा आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले की, “खोटा नरेटिव्ह तयार करणे हे महाराष्ट्रविरोधी कृत्य आहे. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नाही आणि जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल. हा संपूर्ण प्रकल्प कायद्याच्या चौकटीत राहूनच पूर्ण केला जाईल.”

सरकारचा पर्यायी वृक्षारोपणाचा दावा

या प्रकल्पासाठी २३३ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी कंपनीने वन विभागाला २५३ हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. तसेच, प्रकल्पाशी संबंधित क्षेत्रात टोरेंट कंपनीकडून ६० हजार तर वन विभागाकडून ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारे एकूण ९० हजार झाडे लावली जाणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

स्वार्थापोटी विकासकामांना विरोध अयोग्य

‘समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, केवळ राजकीय स्वार्थापोटी या विकासात्मक प्रकल्पाला विरोध केला जात असेल, तर ते अत्यंत अयोग्य आहे. राजकीय स्वार्थापोटी विकासकामांना विरोध करणे योग्य नाही. समाजातील विविध घटकांचे हित लक्षात घेऊनच प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पर्यावरणीय उपाययोजनांच्या आधारेच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

प्रकल्प भीमाशंकरपासून १६ किमीवर

प्रकल्पाच्या स्थानाबाबतही सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून १६ किमी, तर ज्योतिर्लिंग मंदिरापासून २० किमी अंतरावर आहे. हा प्रकल्प इको-सेन्सिटिव्ह झोनच्या बाहेर असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

निसर्गाचा भयानक विनाश - रोहित पवार

सायडोंगर वनक्षेत्रात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा भयानक विनाश सुरू आहे. तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडांची अक्षरशः कत्तल सुरु झालीय.हे होत असताना जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील हजारो-लाखो पक्ष्यांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार, मफलरवाले गेले कुठे?

आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिवाळीत सुंदर दिसायचंय? आजपासूनच सुरू करा ३ गोष्टी; चेहरा, केस आणि फिटनेससाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितला सोपा मार्ग

Skin Care : ग्लोइंग स्किनसाठी फेस मसाज करता? त्वचेनुसार योग्य स्टोन कसा निवडाल?

Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम