महाराष्ट्र

‘कास पठार’ फुलण्यासाठी पावसाचा अडसर; चार महिन्यांचा सततचा पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका

जागतिक वारसा स्थळ व फुलांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले साताऱ्याजवळील कास पठार यंदा फुलण्यासाठी धडपडत आहे. येत्या ४ सप्टेंबरपासून हंगामाची सुरुवात होणार असली तरी गेल्या चार महिन्यांपासून कोसळणारा सततचा पाऊस, सूर्यदर्शनाची उणीव आणि विरळ सूर्यप्रकाश यामुळे फुलकळ्या उमलण्यात मोठा अडसर निर्माण झाला आहे.

रामभाऊ जगताप

कराड : जागतिक वारसा स्थळ व फुलांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले साताऱ्याजवळील कास पठार यंदा फुलण्यासाठी धडपडत आहे. येत्या ४ सप्टेंबरपासून हंगामाची सुरुवात होणार असली तरी गेल्या चार महिन्यांपासून कोसळणारा सततचा पाऊस, सूर्यदर्शनाची उणीव आणि विरळ सूर्यप्रकाश यामुळे फुलकळ्या उमलण्यात मोठा अडसर निर्माण झाला आहे.

मात्र, गणेश विसर्जनानंतर पावसाचे प्रमाण कमी होऊन सूर्यप्रकाश वाढेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे झाल्यास फुलकळ्या झपाट्याने उमलतील आणि पठार पुन्हा रंगीबेरंगी गालिच्यांनी सजेल.

१५ मेपासून अपवाद वगळता दररोजच पाऊस कोसळत असल्याने केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी लोकही कंटाळले आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश विरळ होत असल्याने कासवरील फुलकळ्यांची प्रक्रिया मंदावली आहे. अधूनमधून ऊन पडले तर आवश्यक उष्णता निर्माण होते आणि त्याचा फुलांवर सकारात्मक परिणाम होतो. पण संततधार पावसामुळे कळ्या उमलण्यास उशीर होत आहे, तर गवत मात्र वेगाने वाढत आहे.

साताऱ्याजवळील कास पठार हे जैवविविधतेचे माहेरघर मानले जाते. येथे अनेक दुर्मीळ व रेड डाटा बुकमधील प्रजातींचे आयुष्य जून ते सप्टेंबर या काळात फुलते. यासाठी पाऊस, धुके आणि थंड वातावरण अनुकूल असते; मात्र अतिरेकी पावसामुळे संतुलन बिघडले आहे.

भारताच्या पश्चिम घाटाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान आहे. केवळ पुष्प पठार कास हीच सह्याद्रीची ओळख नाही, तर असंख्य जीवसृष्टी व जैवविविधतेचा हा खजिना आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे फुलांचा बहर मंदावला असला तरी ढग हटले, सूर्यप्रकाश पडला की पठार पुन्हा फुलांनी उजळणारच.
शिवाजी राऊत, पर्यावरणवादी

प्रारंभीचा बहर

सध्या कास पठारावर काही ठिकाणी लाल तेरडा, सीतेची आसवे, गेंद, सोनकी, चवर, टोपली कारवी यांसारखी फुले उमलली आहेत. पण मोठ्या प्रमाणात गालिचा तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. यंदा हंगाम सुरू झाला तरी निसर्गाने साथ दिली तरच पर्यटकांना फुलोत्सवाचा खरा आनंद मिळेल.

आजचे राशिभविष्य, २१ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू