गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का 
महाराष्ट्र

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का

गेल्या काही दिवसांपासून गाजत ‘गोकुळ’ दूध संघाच्या सत्तासंघर्षाचा फैसला अखेर मंगळवारी लागला. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांची अधिकृतरित्या निवड झाली.

Swapnil S

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून गाजत ‘गोकुळ’ दूध संघाच्या सत्तासंघर्षाचा फैसला अखेर मंगळवारी लागला. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांची अधिकृतरित्या निवड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. निवडणुकीत बहुमत असूनही सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला पराभव पत्करावा लागला.

मंगळवारी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या मतदान प्रक्रियेत राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत बाजी मारली, तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांची मते विजयासाठी अत्यंत निर्णायक ठरली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील, तर समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर रिंगणात होते. मतदानासाठी महायुतीचे संचालक पिवळे फेटे बांधून आले होते. दोन्ही गटांच्या संचालकांनी मतदान करण्यापूर्वी गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण २९ सदस्यांनी मतदान केले (२५ निर्वाचित आणि ४ शासन नियुक्त). न्यायालयाच्या आदेशानुसार, २५ निर्वाचित सदस्यांची मते एका मतपेटीत आणि शासनाने नियुक्त केलेल्या ४ सदस्यांची मते दुसऱ्या स्वतंत्र मतपेटीत सीलबंद ठेवण्यात आली होती. नियमानुसार, २५ निर्वाचित सदस्यांमधून स्पष्ट बहुमत मिळाल्यास ४ सीलबंद मतांची मोजणी होणार नव्हती. मात्र, निकालात शासन नियुक्त ४ संचालकांची मते निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

‘गोकुळ’ दूध संघाच्या १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समविचारी आघाडीला १३, तर राष्ट्रवादी-भाजप-शिंदेसेना-वजन स्वराज्य आघाडीला १२ जागा मिळाल्या होत्या. सभागृहातील बहुमत काँग्रेसकडे असले तरी ‘गोकुळ’ दूध संघाच्या पोटनियमानुसार सभेसाठी १४ संचालकांचा कोरम अपेक्षित होता; त्यामुळे २९ ऑक्टोबरची अध्यक्ष निवड सभा तहकूब झाली होती. त्यानंतर अध्यक्ष निवडीचे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवड घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर शासकीय पातळीवरील हालचाली गतिमान होऊन चार शासन नियुक्त संचालकांची नियुक्ती करत त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे अध्यादेश काढण्यात आले. चार शासन नियुक्त संचालकांसह शासनाने काढलेल्या अध्यादेशाला काँग्रेस आघाडीने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन न्यायालयाने शासननियुक्त चार संचालकांचा मताचा अधिकार कायम ठेवल्याने अध्यक्ष निवडीचा पेच सुटला होता.

अंतिम निकाल २५ नोव्हेंबरच्या सुनावणीवर अवलंबून

मंगळवारी मतदान होऊन राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी, ही संपूर्ण प्रक्रिया २५ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीतील अंतिम निकालाच्या अधीन असेल, असे न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजेश पाटील यांनी बाजी मारली असली तरी, आता कायदेशीर लढाईत पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचा रडीचा डाव -राजू शेट्टी

"गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीमध्ये महायुती सरकारने रडीचा डाव खेळून बेकायदेशीर पद्धतीने चेअरमन निवड करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप करत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ८ कायदेशीर प्रश्नांचे खुले आव्हान दिले आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त

'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत निर्माण झालेला कोरमचा पेच, त्यावर शासननियुक्त चार संचालकांची केलेली नेमणूक, त्या परिस्थितीवर सोमवारी काँग्रेस आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला विराट मोर्चा, या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुतीच्या नेत्यांना दिलेला इशारा या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणेरी फाटा ते ‘गोकुळ’ दूध प्रकल्प या मार्गावर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे ६०० पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे १०० जवान असा तब्बल ७०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राजेश पाटील यांची राजकीय कारकीर्द

राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली राजेश पाटील हे आमदार झाले होते. गोकुळच्या गेल्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. राजेश पाटील हे शिवेसनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत.

निवडणुकीला राजकीय रंग दिला -फडणवीस

गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे आहे. कोरम पूर्ण होत नसल्यामुळे सरकारला वाटले असते तर निवडणुकीनंतर लगेच संचालक बनवले असते. उच्च न्यायालयात काल अध्यादेशात डिफेक्ट नाही, असे सांगितले. चार जणांची मते वेगळी ठेवा आणि इलेक्शन पूर्ण करा, असेही न्यायालयाने सांगितले. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत निर्णय केला असता तर शासननियुक्त संचालक पाठवले नसते. मात्र, गोकुळच्या निवडणुकीला राजकीय रंग दिला गेला, राहुल गांधीदेखील त्यात उतरले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही -चंद्रकांत पाटील

गोकुळचा निकाल लागल्यानंतर बंटी पाटील यांनी १५ दिवस फक्त महायुतीला शिव्या दिल्या, खोटे नरेटिव्ह पसरवले. एखाद्या लहान मुलाला खेळणे मिळाले नाही की, ते हातपाय आपटते, त्रागा करते, तसेच बंटी पाटील यांचे झाले होते. बंटी पाटील हे त्यांच्या नावाप्रमाणे बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही, अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांची खिल्ली उडवली.

महायुती प्रत्येकी सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद वाटून घेणार

महायुतीकडून गोकुळच्या अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांना अध्यक्षपदाची संधी मिळणार असून, गोकुळच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटून घेतला जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत तीन किंवा चार अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला अध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bhaubeej 2026 Marathi Wishes : 'आली आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी!' भाऊबीजेनिमित्त खास शुभेच्छा अन् कार्ड्स

आजचे राशिभविष्य, ११ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Health Tips : रोज पुरेशी झोप घेत नाही? शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम; तज्ज्ञ सांगतात...

मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना ४२१ कोटींचे अनुदान; पुणे महापालिकेला सर्वाधिक १०९ कोटी, नाशिकला २१ कोटी २५ लाख रुपये

कपडे धुणे झाले आता महाग; 'सर्फ एक्सेल', 'रिन', 'व्हील'च्या किमतीत ११ टक्क्यांपर्यंत वाढ