महाराष्ट्र

हॉस्टेलमध्ये मुलं सुरक्षित आहेत का? लहानग्यांना बॅट, पट्टयाने अमानुष मारहाण; कोल्हापूरमधील रॅगिंगचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका खासगी निवासी शैक्षणिक संस्थेतील हॉस्टेलमधून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मोठ्या विद्यार्थ्यांनी लहानग्या विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅट आणि दांडक्यांनी निर्दयपणे मारहाण केल्याचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेहा जाधव - तांबे

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका खासगी निवासी शैक्षणिक संस्थेतील हॉस्टेलमधून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मोठ्या विद्यार्थ्यांनी लहानग्या विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅट आणि दांडक्यांनी निर्दयपणे मारहाण केल्याचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अमानुष कृत्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हॉस्टेलमधील मुलं खरंच सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

लहान मुलांना मिळेत त्या वस्तूने मारहाण

ही घटना हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील श्री. शामराव पाटील शिक्षण समूहाच्या वसतिगृहात घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की काही विद्यार्थी हॉस्टेलच्या गॅलरीत आणि बाथरूममध्ये लहान मुलांना ओळीत उभं करून त्यांना निर्दयपणे मारहाण करत आहेत. काही जण हातात सापडेल त्या वस्तूने प्रहार करताना दिसत आहेत. एका ठिकाणी तर मोठ्या विद्यार्थ्यांचा गट एका लहान मुलाला बाथरूममध्ये नेऊन बेल्ट आणि बॅटने अंधाधुंद मारहाण करताना दिसतो. हा सर्व रॅगिंगचा प्रकार असल्याचे समजते.

ज्या विद्यार्थ्यावर बाथरूममध्ये हल्ला झाला त्याचं नाव सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६, रा. उचगाव, ता. करवीर) असं आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या प्रकारानंतर पेठवडगाव पोलिस ठाण्यात हॉस्टेलच्या रेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ वादातून अमानुष मारहाण

फिर्यादीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सिद्धीविनायक आणि वर्गातील पृथ्वीराज कुंभार या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. रेक्टरने दोघांनाही ताकीद दिली होती. मात्र, काही वेळानंतर पीटी परेडवेळी आरोपीने सिद्धीविनायकला स्टेजवर नेऊन बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर पसरला आणि संताप उसळला.

इतर शैक्षणिक संस्थांमध्येही मारहाणीच्या घटना

तळसंदेसह परिसरातील इतर काही शैक्षणिक संस्थांमधूनही विद्यार्थ्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. बॅटच्या अशा अंधाधुंद माऱ्यामुळे एखाद्याच्या डोक्याला गंभीर इजाही होऊ शकते. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांमधील शिस्त आणि सुरक्षा व्यवस्था खरोखर अस्तित्वात आहे का? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकारानंतर कोल्हापूर पोलिस आणि शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. व्हिडिओ नेमका कधी आणि कोणत्या प्रसंगी शूट करण्यात आला याबाबत तपास सुरू असून, संबंधित हॉस्टेल प्रशासनाकडूनही सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप