सततच्या पावसाने कोकणातील भात कापणीला ब्रेक! कष्टाचे सोने मातीमोल; बळीराजा कोलमडला  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

सततच्या पावसाने कोकणातील भात कापणीला ब्रेक! कष्टाचे सोने मातीमोल; बळीराजा कोलमडला

सिंधुदुर्गात गेल्या २-३ आठवड्यांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली असून ती चिखलाने माखली आहेत. काही पिकांना कोंब फुटले आहेत. काही शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन पिकांची कापणी केली, मात्र शेतीच्या बांधावर ठेवलेली भातपिके आता अक्षरश: पाण्यात तरंगत आहेत.

Swapnil S

राजन चव्हाण/सिंधुदुर्ग

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह कोकण पट्ट्यात बरसणाऱ्या पावसामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. सिंधुदुर्गात गेल्या २-३ आठवड्यांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली असून ती चिखलाने माखली आहेत. काही पिकांना कोंब फुटले आहेत. काही शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन पिकांची कापणी केली, मात्र शेतीच्या बांधावर ठेवलेली भातपिके आता अक्षरश: पाण्यात तरंगत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी कोलमडला आहे.

पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे संपूर्ण राज्यभर आता कापणी केलेली पिके आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात आणण्यासाठी शेतकरी कुटुंबांची लगबग सुरू आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्टरवर यंदा भातपिकांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ३० हजार हेक्टरवरील भातकापणी पूर्ण झाली असली तरी अजूनही सुमारे २५ हजार हेक्टरवरील भातकापणी शिल्लक आहे. कापलेले भात व्यवस्थित सुकले नाही तर त्याचे तुकडे पडण्याची दाट शक्यता आहे.

पावसाचा फटका फक्त भातपिकांनाच बसला नाही तर सुमारे तीन हजार हेक्टरवरील नाचणी पिकालाही बसला आहे. अजूनही ८ ते १० दिवस पावसाचा मुक्काम असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यामुळे रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंबा, काजू आणि इतर फळ पिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली असून जिल्हा प्रशासन, कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाऊस पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत नुकसानीचा अंदाज बांधणे अवघड आहे. २१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे कापलेल्या भाताला पुन्हा कोंब फुटले. तर काहींचे भातपीक शेतातच कुजले. काही शेतकऱ्यांनी चिखलातच भात कापणी करून घरी आणले आणि जागा मिळेल तिथे पसरवून सुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपायोग झाला नाही.

पावसामुळे पर्यटन ठप्प, मासेमारीवरही परिणाम

लांबलेल्या पावसामुळे यंदा पर्यटन व्यवसायालाही जबर फटका बसला आहे. दिवाळीची सुट्टी असूनही सिंधुदुर्गाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. पाऊस असल्यामुळे पर्यटकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. त्यातच मासेमारी ठप्प झाल्याने मच्छिमार संकटात सापडला आहे. रविवारपासून ठिकठिकाणी, गावोगावी जत्रांना सुरुवात झाली आहे. मात्र पावसामुळे जत्रांवरही विरजण पडण्याची शक्यता आहे.

गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

Mumbai : आंबेडकर स्मारक २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ऑफिस सुटल्यानंतर 'नो कॉल, नो ई-मेल'; राइट टू डिस्कनेक्ट' विधेयक लोकसभेत सादर

अखेर ट्रम्प यांची इच्छा पूर्ण; बनले जागतिक 'शांतिदूत'; 'फिफा'कडून पुरस्कार मिळवून स्वतःचाच केला गौरव

विमान कंपन्यांच्या मनमानी भाडेवाढीला वेसण; भाडेमर्यादेचे पालन केले बंधनकारक; ८०० विमान उड्डाणे रद्द