महाराष्ट्र

'कोयना' जंगलात 'बाजी' वाघाची डरकाळी; तीन नर वाघांचा नियमित वावर सुरू

सातारा-सांगली जिल्ह्यातील कोयना ते चांदोलीच्या टोकापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून तीन नर वाघ STR T1, T2 आणि T3 यांचा नियमित वावर सुरू असून त्यांनी आपापल्या हद्दीही निश्चित केल्या आहेत.

रामभाऊ जगताप

कराड : सातारा-सांगली जिल्ह्यातील कोयना ते चांदोलीच्या टोकापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून तीन नर वाघ STR T1, T2 आणि T3 यांचा नियमित वावर सुरू असून त्यांनी आपापल्या हद्दीही निश्चित केल्या आहेत. यातील T1 'सेनापती' आणि T2 'सुभेदार' हे वाघ प्रामुख्याने चांदोली परिसरात फिरत असताना, कोयना भागात 'बाजी' (STR T3) या नर वाघाने आपले हद्द क्षेत्र निश्चित केले आहे.

विशेष म्हणजे अखिल भारतीय व्याघ्र गणना फेज-१ साठी आलेल्या स्वयंसेवकांना कोयना अभयारण्याच्या पाली व जुगंटी परिसरात मोठ्या आवाजात बाजी वाघाच्या डरकाळ्या ऐकण्यास मिळाल्या. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे सुरक्षित वास्तव्य असून हा प्रकल्प दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यापूर्वी देशातील ताडोबा-अंधारीसह विविध अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पांमधून वाघ व वाघीणींचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 'बाजी' नर वाघ तसेच 'तारा' वाघीण या मुक्तपणे संचार करत आहेत. 'बाजी' नर वाघाने भैरवगड ते पाली-मालदेव परिसरापर्यंत आपले हद्द क्षेत्र निश्चित केले असून, कोयना भागात तो नियमितपणे फिरत आहे. तसेच आपल्या पोटपूजेसाठी भक्ष्यांची शिकारही करीत आहे.

कोयना जंगलातील काही ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये STR T3 'बाजी' या नर वाघाचे फोटो व व्हिडिओ नुकतेच कैद झाले आहेत. या वाघाच्या पायाच्या पंज्याचा आकार साधारणतः १६ से.मी. x १६ से.मी. इतका असून, तो जवळपास ३ ते ३.५ वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर वाघ आहे.

राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अखिल भारतीय व्याघ्र गणना फेज-१ राबविण्यात आली. या सर्वेक्षणादरम्यान विविध ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांतून वन्यप्राण्यांच्या हालचालींची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे या काळात काही स्वयंसेवकांना पाली व जुगंटी परिसरात बाजी वाघाच्या जोरदार डरकाळ्या ऐकू आल्या, तर डरकाळ्या फोडतानाचे काही दृश्य कॅमेऱ्यांत कैद झाले आहेत.

रोजगाराच्या नव्या संधी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात मादी वाघीणींची संख्या वाढून आणि सध्या असलेल्या बाजी नर वाघामुळे व्याघ्र वंशवृद्धी होण्याची शक्यता आहे. परिणामी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघांच्या सुरक्षित वास्तव्यामुळे अधिक समृद्ध होत असून, येत्या काळात वन पर्यटनात मोठी वाढ होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव’ चित्ररथाची मोहिनी; संस्कृती, परंपरा आणि स्वावलंबनाचे दर्शन, Video व्हायरल

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पराक्रमाचं दर्शन; लढाऊ विमानांची दिमाखदार परेड, पाहा Video

Republic Day 2026 : शिवाजी पार्क ते बीएमसी मुख्यालय; मुंबईत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, Video

Mumbai : परळ आगाराच्या विश्रांतीगृहात आढळल्या दारूच्या बाटल्या; बस आगाराची स्वतंत्र विभागीय चौकशी

मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड