महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा; सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. सरकारने उत्तर दिले नाही, तर त्यांना कोर्टात यासंबंधीचे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिला आहे.

Swapnil S

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. सरकारने उत्तर दिले नाही, तर त्यांना कोर्टात यासंबंधीचे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिला आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये २ लाख नावे एकट्या पुण्यात कमी केली आहेत. मग तुम्ही कोणत्या आधारावर फॉर्म भरून घेतले? लाडकी बहीणमध्ये पुरुषांनीही लाभ घेतला. फॉर्म भरून घेताना तुम्हाला स्त्री आणि पुरुष हा फरक कळाला नाही का? कोणत्या यंत्रणेने हे फॉर्म भरून घेतले. कोणते सॉफ्टवेअर वापरण्यात आले होते. कोणत्या कंपनीला हे काम दिले होते. कोणी ही यंत्रणा यासाठी कामाला लावली होती, असे प्रश्न उपस्थित करून सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली. ज्या लोकांवर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची जबाबदारी होती, त्यांची जम्बो चौकशी सुरू केली पाहिजे. जर हे राज्य सरकारने केले नाही तर नाईलाजाने आम्हाला केंद्र सरकारकडे मागणी करावी लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

“दोन दिवसांपूर्वी जी प्रभाग रचना करण्यात आली आहे, त्याबाबत सगळ्यांमध्ये अस्वस्थता आहे. जे काही व्हायचे, ते पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे, अशी विनंती निवडणूक आयोगाला करणार आहोत. आता हरकती सूचनांसाठी १० तारखेपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. अनेक नगरसेवकांचे प्रभाग आपल्या सोयीसाठी भाजपने तोडले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतचोरीबाबत जे विधान केले आहे, त्याबाबत सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, बहिष्कार टाकायचा प्रस्ताव त्यांनी आणला होता. लोकशाहीत बहिष्कार कसा टाकणार म्हणून ते तसेच राहिले. पण याबाबत महाविकास आघाडीचे पहिले पत्र आहे. मत चोरीबाबत चौकशी करायची असेल, तर बारामतीपासून सुरुवात करा. माझ्या मतदारसंघापासून चौकशी करा. पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत बारामती तालुक्यातील इंदापूर गावात मतदान वाढले, हे लक्षात आल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.

नियमानुसार प्रभाग रचना व्हावी!

सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची विविध विषयांसंदर्भात भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “दोन दिवसांपूर्वी जी प्रभाग रचना करण्यात ती सदोष आहे. अनेक प्रभाग हे आपल्या सोयीसाठी तोडण्यात आले आहेत. खरे तर नियमाने प्रभाग व्हायला हवा, असे निवडणूक आयोगास आम्हाला सांगावेसे वाटते. नियम आणि कायदा आहे, त्या प्रमाणे प्रभाग रचना व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी एका विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे, त्याचे मी स्वागत करते, असेही त्या म्हणाल्या.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले