महाराष्ट्र

लासलगाव : कांदा दरातील घसरण सुरूच; शेतकरी चिंताग्रस्त

होळी सणा निमित्त तीन दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाला.

Swapnil S

हारून शेख/ लासलगाव

होळी सणा निमित्त तीन दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाला. लाल कांद्याला सरासरी १३७०, तर उन्हाळ कांद्याला सरासरी १४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत सोमवारी लाल कांद्याच्या किमान भावात २००, तर सरासरीत १५० रुपये क्विंटल मागे घसरण झाली. ईदच्या पार्श्वभूमीवर कांद्याला वाढती मागणी असताना २० टक्के निर्यात शुल्क असल्याने कांदा भावात मोठी घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

संभाव्य बिहार विधानसभा निवडणुकीवर सर्व पक्षांचे लक्ष असल्याने कांद्याची समस्या लवकर सुटणार नाही अशीच शक्यता दिसत आहे. लाल कांद्याबरोबर नवीन उन्हाळ कांदाही मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये दाखल होत आहे. यामुळे कांदा दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. गेल्या सोमवारी विधानसभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी कांद्याच्या २० टक्के निर्यात शुल्कावर, तर लोकसभेत दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी प्रश्न उपस्थित केला. १७ फेब्रुवारी रोजी उन्हाळ आणि लाल कांदा सरासरी २६०० रुपये क्विंटलने विक्री झाला. तोच कांदा १२ मार्च रोजी १४०० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. देशात ३०० लाख टनांपेक्षा जास्त कांद्याचे साधारणपणे उत्पादन होत असते. यापैकी सुमारे १० ते १५ टक्के कांदा निर्यात केला जातो. निर्यात कमी असली तरी, देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

व्यापाऱ्यांनीही २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. रमजान ईद जवळ येत असल्याने, मध्य पूर्वेकडून मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी निर्बंध उठवण्याची ही योग्य वेळ आहे," असे नाशिकमधील निर्यातदारांचे मत आहे.

गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. होळी सणामुळे तीन दिवस हा लिलाव बंद होता. मात्र तीन दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव समितीत कांद्याचा लिलाव पुन्हा सुरू झाला. सोमवारी झालेल्या लिलावात बुधवारच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण कायम होती. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.

दिवसभरात १० हजार ८३ क्विंटल कांद्याची आवक

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ५७० वाहनांमधून १० हजार ८३ क्विंटल कांद्याची आवक होऊन लाल कांद्याला किमान ६०० कमाल १५००, तर सरासरी १३७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, तर उन्हाळ कांद्याला किमान ७०० कमाल १७०२, तर सरासरी १४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री