महाराष्ट्र

‘काळ्यानिळ्या रेषा’तील पात्रांनी मला समृद्ध केले; साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजू बाविस्कर यांची भावना

लहानपणी जशी मला वाढवणारी माणसं भेटत गेली, तशीच मोठेपणीही कलेत मार्गदर्शन करणारी माणसं मिळाली. त्यांच्या बोटाला धरूनच मी इथपर्यंत पोहोचलो.

विजय पाठक

विजय पाठक / जळगाव

लहानपणी जशी मला वाढवणारी माणसं भेटत गेली, तशीच मोठेपणीही कलेत मार्गदर्शन करणारी माणसं मिळाली. त्यांच्या बोटाला धरूनच मी इथपर्यंत पोहोचलो. ‘काळयानिळ्या रेषा’ या माझ्या आत्मकथनात आलेली सर्व पात्रं, माझं गाव, सातपुडा पर्वतरांग, तसेच तिथल्या गोष्टी सांगणाऱ्या बायाबापड्यांनी मला खूप समृद्ध केलं. आयुष्यात भेटलेल्या चांगल्या-वाईट लोकांचे अनुभव मनात साचले होते, तेच या आत्मकथनातून मोकळे केले, असे मनोगत चित्रकार राजू बाविस्कर यांनी व्यक्त केले. त्यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ या आत्मकथनपर पुस्तकाला सन २०२५ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केल्या.

राजू बाविस्कर हे जळगाव येथील पी. एम. मुंदडा हायस्कूलमधून चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या आत्मकथनातून गावकुसाबाहेरच्या माणसांच्या जगण्याचे वास्तव चित्रण केले आहे. समाजातील उपेक्षा आणि अवहेलना अस्वस्थ करणारी असली तरी त्या अनुभवांचे प्रभावी चित्रण या पुस्तकात आढळते. आत्मकथनाच्या माध्यमातून दुर्लक्षित समूहाचे कष्टमय जीवन त्यांनी मांडले आहे. मातंग समाजाची जीवनशैली, संस्कृती आणि त्यांचे कष्ट यांचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटले आहे.

राजू बाविस्कर यांचा प्रवास चित्रकार म्हणून सुरू झाला. विविध नियतकालिकांसाठी त्यांनी चित्रे रेखाटली. गावाकडील शेतमजूर, भिक्षेकरी, सकामकरी आणि चेहरे नसलेली सामान्य माणसं त्यांच्या चित्रांचा केंद्रबिंदू होती. पुढे हीच चित्रं त्यांच्या लेखनातून अधिक बोलकी झाली. आपल्या चित्रांना विशिष्ट शैलीत बसवण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. “आपण चित्र काढावं आणि लोकांनी ते पाहावं,” एवढाच त्यांचा साधा हेतू होता. आतापर्यंतचे आयुष्य मनात साचत गेले आणि तेच चित्रांत तसेच लेखनात उमटले, असे ते सांगतात. आजही समाजातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. ‘परिवर्तन’ संस्थेमुळे साहित्यवर्तुळ अधिक विस्तारले असल्याचे ते म्हणाले.

खानदेशातील लोकसंस्कृतीचा अनोखा मिलाफ

ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोतवाल यांनीही या आत्मकथनाचे कौतुक करताना सांगितले की, राजू बाविस्कर यांच्या चित्रांमध्ये सतत दिसणारी माणसं आणि त्यांचे जगणेच ‘काळयानिळ्या रेषा’ या आत्मकथनात प्रतिबिंबित झाले आहे. समाजव्यवस्थेचे अनोखे दर्शन घडवणारी त्यांची कथनशैली उत्कट आणि संयत आहे. यात रडगाणे नसून व्यवस्थेचा तळ शोधणारा तिरकस दृष्टिकोन दिसतो. मराठी साहित्यास तुलनेने अपरिचित असलेले खानदेशातील लोकजीवन, लोकभाषा आणि लोकसंस्कृतीचा अनोखा मिलाफ या आत्मकथनात दिसून येतो.

‘काळयानिळ्या रेषा’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होताच जळगावच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाची लाट पसरली. यापूर्वी भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर आणि श्रीकांत देशमुख यांना हा पुरस्कार मिळाला होता. आता राजू बाविस्कर यांनाही हा सन्मान मिळाल्याचा आनंद झाला आहे.
शंभू पाटील, संस्थापक अध्यक्ष 'परिवर्तन’
‘काळयानिळ्या रेषा’ हे आत्मकथन असून सांस्कृतिक आणि सामाजिक वेगळे महत्त्व आहे. “या पुस्तकात चित्रे शब्दांच्या माध्यमातून उमटली आहेत. मराठी साहित्यात हे आत्मकथन मैलाचा दगड ठरेल.
जितेंद्र कुवर, कवी
‘काळयानिळ्या रेषा’ हे केवळ एका चित्रकाराचे स्वकथन नसून खानदेशातील ग्रामीण भागातील वंचित समाजाचे वास्तवदर्शी चित्र आहे. मातंग समाजाच्या स्वाभिमानाची ही चित्तकथा असून या वर्गाच्या अस्वस्थतेचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ कवी धरणगाव

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी