रामभाऊ जगताप/कराड
इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करत स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर पालिकेची स्थापना स्वातंत्र्यापूर्व काळात इंग्रजांनी इ. स. १८५३ मध्ये केली असून ही भारतातील पहिल्या क्रंमाकांची स्थापन केलेली नगरपालिका ठरते. आता हिंदुत्ववादी विचारधारेच्या राज्य सरकारमुळे रहिमतपूरसारख्या नावलौकिक प्राप्त शहराचे नाव बदलण्याची भाजप मंत्री यांच्या घोषणेबाजीनंतर रहिमतपूर नाव बदलण्यास मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्याला दीर्घ ऐतिहासिक परंपरा आहे तसेच रहिमतपूरलाही खूप मोठा इतिहास आहे. छ. शिवाजी महाराज व अफजल खान भेटीच्यावेळी प्रतापगडाच्या रणसंग्रामात सहभागी होण्यासाठी अफझल खानासोबत वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, सय्यद बंडा यांच्याबरोबरच अफजल खानाच्या मदतीसाठी रहिमत खानलाही विजापूरवरून वाईला सैन्यासह पाठवले होते. वाटेत रहिमत खानाने कमंडलू नदीकाठावर काळीशार जमीन पाहून तेथे आपली छावणी टाकली. याच छावणीचे पुढे छोट्या रहिमतपूर गावात रूपांतर झाले. आजही हे गाव रहिमत खानाच्या नावाने ‘रहिमतपूर’ म्हणून ओळखले जाते तर दुसऱ्या बाजूला ज्यावेळी साधुंनी रणदुल्ला खानास दीक्षा दिली त्यावेळी त्याला अत्यानंद झाला आणि रणदुल्ला खान परमेश्वरास उद्देशून म्हणाला, ‘माझ्यावर फार मोठी दया म्हणजे राहमत केली आहे.’ रणदुल्ला खानाने या ठिकाणाला रहिमतपूर म्हणजेच या गावाला रहिमतपूर नाव दिल्याचा संदर्भ आर. पी. माने यांच्या ‘रहिमतपूर नगरी’ या लेखात आढळतो.
पेशव्यांच्या कारकीर्दीत त्यांची एक टांकसाळ रहिमतपूरला होती. येथे मोहरा, रुपये, चांदीची नाणी व पैसे या टांगसाळीत तयार केले जात होते. रहिमतपूर गावाचे असेही काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात. त्यामुळे आता या गावाचे रहिमतपूर हे नाव साता समुद्रापलीकडे पाठवण्याचे काम कवी गिरीश, पद्मश्री वसंत कानेटकर, गो. पू. देशपांडे, डॉ. राजेंद्र शेंडे, गायिका बेला शेंडे, व्याख्याते नितीन बानगुडे, अण्णा देशपांडे, स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, सरदार बाळासाहेब माने आणि अलीकडच्या काळामध्ये गुलाबराव माने, चित्रलेखा माने कदम, सुनील माने, वासुदेवराव माने, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत, भरत शेडगे अशा अनेक रथी महारथी यांच्यामुळे परिचित झाले आहे. त्यांना रहिमतपूर नाव बदलून दुसरे कुठले नाव द्यावे, असे कधीही वाटले नाही. दरम्यान, रहिमतपूरचे नाव रघुनाथपूर जाहीर करून गुढी उभारण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याला थंड प्रतिसाद मिळाला होता. महायुतीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा नामांतराची हाक दिली. पण रहिमतपूर विकासासाठी एक रुपया निधीची घोषणा न केल्यामुळे या नामांतराला आता तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. आज ज्या ज्या ठिकाणी नामांतर झालेले आहे. त्या ठिकाणची सर्वच स्तरावरील परिस्थिती बदलली नाही . याचाही संदर्भ दिला जात आहे. रहिमतपूरची लोकसंख्या पन्नास हजारच्या पुढे असली तरी पाच- पंचवीस लोकांनी केलेली मागणी त्यांच्या दृष्टीने रास्त असली तरी सर्वानुमते ती मागणी नाही. हे मात्र स्पष्ट झाले,अशी प्रतिक्रिया उमटत आहे तर रहिमतपूर येथील राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
सर्वधर्म समभावाची शिकवण तेवत ठेवण्याची गरज
शेक्सपियर यांनी म्हटले नावात काय आहे? पण अलीकडे विकासकामे, धोरणात्मक निर्णयापेक्षाही हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा येईल, असे कुणीही कृत्य करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी. म्हणून युती सरकारने शिवशाही बस असे नामकरण केले. आज स्वारगेट पुणे येथील एसटी बसमधील प्रकारामुळे सध्या शिवशाही हे नाव गाजत आहे, याची खंत वाटते. नाव बदलण्यापेक्षा आपली मानसिकता बदलून सर्वधर्म समभावाची शिकवण तेवत ठेवावी, अशी मागणी आता पुढे आलेली आहे.