महाराष्ट्र

कोरोनाच्या काळात लुटालूट ;मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Swapnil S

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच्या काळात लोक भीतीच्या सावटाखाली जगत असताना अक्षरश: लुटालूट केली. कफनचोर, खिचडीचोर अशा बिरुदावलीही कमी पडतील, इतका भ्रष्टाचार झाला. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी गेले. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीने टेंडरचा पाऊस पडल्याचा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना हल्लाबोल केला. महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत कोरोनाच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला. या काळात सग्यासोय-यांवर टेंडरचा पाऊस पडला. सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण आणि औषध दाखविण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम यांनी केले आहे.  त्यामुळे दुसऱ्यावर आरोप करताना विचार करा, असा इशाराही त्यांनी दिला.

आपल्याच संबंधितांना वेगवेगळे टेंडर देऊन अक्षरश: घरे भरली. ऑक्सिजन प्लांटमध्येही खूप भ्रष्टाचार झाला. याचे कंत्राट उत्तर प्रदेशातील महामार्ग कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. हायवे बांधणा-या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम, ऑक्सिजन प्लांटचे काम दिले. अनेकदा एका महिन्याचे काम दाखवून सातत्याने कामे देण्यात आली. एवढेच नव्हे, तर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पंप, जुहू रुग्णालयात हाऊस किपिंगचे काम, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात काम दिले. तसेच महापालिका रुग्णालयात एसीशी संबंधित कामे देण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

यासोबतच ३०० ग्रॅमऐवजी १०० ग्रॅम खिचडी दिली. गोरगरिबांच्या तोंडातील २०० ग्रॅम खिचडीचा घास हिरावून घेतला आणि स्वत:च्या तुंबड्या भरल्या. कुणाच्या खात्यात किती पैसे पडले, याची माहिती आमच्याकडे आलेली आहे, असे सांगतानाच सह्याद्री रिफ्रेशमेंट ही कंपनी कदम आणि पाटकर यांच्याशी आहे आणि पात्रतेसाठी दाखविलेले किचन पार्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते. विशेष म्हणजे या हॉटेलच्या मालकालाही आपले किचन खिचडीसाठी दाखविल्याचे माहित नव्हते. अशा किती तरी सुरस कथा बाहेर येत आहेत. याचे लवकरच बिंग फुटेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. 

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त