मुंबई : इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा सक्ती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शक्तिपीठ महामार्ग अशा विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे नेत्यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन विविध प्रश्नावरून गाजण्याची शक्यता आहे.
३० जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून ते १८ जुलैपर्यंत चालणार आहे. त्रिभाषा धोरणांतर्गत हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेला विरोध पाहता सरकारने हिंदी भाषा ऐच्छिक असणार असे स्पष्टीकरण दिले असले तरीही तिसरी भाषा म्हणून हिंदीवर सरकार ठाम आहे. त्यामुळे याबाबत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
शेतकरी आत्महत्येची प्रमुख कारणे म्हणजे कर्जबाजारीपणा, अपुरी मदत आणि शासकीय उदासीनता. या प्रश्नावरही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
शक्तिपीठ महामार्गावरून नवा वाद
राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पासाठी सरकारला आणखी कर्ज घ्यावे लागणार आहे. सध्या राज्य सरकारवर सुमारे ९ लाख कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे आर्थिक तूट वाढण्याची शक्यता निर्माण झाला आहे. परिणामी शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दाही चांगलाच गाजण्याचा अंदाज आहे.