एक्स
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये, १०० युनिट मोफत वीज; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

Maharashtra assembly elections 2024: लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी ३ हजार रुपये, वर्षाला ५०० रुपयांत सहा सिलिंडर, कंत्राटी भरती बंद, ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत आदी आश्वासने महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्रनामा’ या जाहीरनाम्यात दिली आहेत.

Swapnil S

मुंबई : लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी ३ हजार रुपये, वर्षाला ५०० रुपयांत सहा सिलिंडर, कंत्राटी भरती बंद, ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत आदी आश्वासने महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्रनामा’ या जाहीरनाम्यात दिली आहेत.

हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्रनामा’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन रविवारी झाले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

मविआने सत्तेवर आल्यास १०० दिवसांचा अजेंडा जाहीर केला आहे. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी नवे औद्योगिक धोरण बनवले जाईल.

महाराष्ट्रनाम्यातील तरतुदी

जन्मानंतरच्या पहिल्या सहा वर्षांत मुलांचा बौद्धिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास सर्वाधिक वेगाने होतो. या दृष्टीने पालकांचे प्रबोधन व मुलांच्या शिक्षणासाठीचे धोरण आखणार

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देणार

ओबीसींना १० वीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती तातडीने मिळण्याची व्यवस्था करणार. शिष्यवृत्ती वेळेत न मिळाल्यास तक्रार मांडण्याची व्यवस्था निर्माण करून त्याचे २१ दिवसांत निवारण करणार

१० वीनंतरच्या शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात ३ वसतिगृहे निर्माण करणार

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची संख्या वाढविणार शिष्यवृत्तीसाठीच्या अटी कमी करणार

'बार्टी', 'महाज्योती' आणि 'सारथी'मार्फत देण्यात येणारा शिष्यवृत्तीचा निधी वाढविणार

बेरोजगारीचे उग्र स्वरूप पाहता दहावी-बारावी अनुत्तीर्णांसाठी आयटीआय दोन वेळेत चालविणार

रोजगारक्षमता आणि कौशल्य निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि आयआयटी, मुंबई या संस्था संयुक्तपणे काम करणार

'एमपीएससी'चे वेळापत्रक निश्चित करणार, परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत लावणार. प्रवेश परीक्षा फी माफ करणार

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रंथालये आणि प्रत्येक तालुक्यात एक अशाप्रकारे ३५८ वातानुकूलित अभ्यासिकांची निर्मिती करणार

रॅगिंग प्रतिबंधक कायद्याचे पुनर्विलोकन करणार, २०१२ मध्ये स्वीकारलेल्या छेडछाडमुक्त महाराष्ट्र धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणार

कोकणात 'फिशिंग अँड मरीन सायन्स विद्यापीठ स्थापन करणार

पुण्यात नियोजन व वास्तुविशारद प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थापना करणार

कुशल अध्यापक निर्मितीसाठी अध्यापक प्रशिक्षण विद्यापीठ विकसित करणार

आरोग्यासाठी घोषणा

महाराष्ट्राच्या जनतेला निरोगी, निरामय आरोग्य लाभावे, मानसिक आरोग्य सुदृढ असावे यासाठी 'निरामय महाराष्ट्र' अभियान राबविणार. याअंतर्गत योगसाधना, निरनिराळे व्यायामप्रकार, आहार नियोजन, नियमित तपासण्या यासंदर्भात सार्वजनिक-स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून आयोजित उपक्रमांना प्रोत्साहन देणार.

लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये

महिलांना वर्षाला ५०० रुपयांत सहा सिलिंडर

कंत्राटी भरती बंद

३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत

विधवा महिला सन्मान कायदा करणार

राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा-महाविद्यालयांतील रखडलेली शिक्षक भरती प्राधान्याने सुरू करणार

शिक्षण हक्क कायद्यातील बालकांच्या मोफत शिक्षणाची मर्यादा वाढविणार

शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेसची फी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार

सरकारी शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणावरील तरतूद वाढविणार

राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम्सची व्यवस्था करणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स, सायकल आणि वाहनसेवा मोफत देणार

जिल्हा परिषद शाळा बंदीचा निर्णय रद्द करणार, पटसंख्येअभावी शाळा बंद करणार नाही, तसेच आरटीईच्या कक्षेबाहेर एकही शाळा न राहण्याची दक्षता घेणार

सामाजिक न्यायासाठी घोषणा

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर नेमलेल्या बापट व रेणके आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करून योग्य शिफारशी अंमलात आणणार

मागास, उपेक्षित आणि आदिवासी जात समूहांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करून त्याचा पूर्ण वापर करणार. त्यांच्यासाठीच्या शंभर टक्के निधीचा विनियोग करणार, त्यांचे हक्काचे बजेट सुरक्षित ठेवण्यासाठी कायदा करणार.

आदिवासी समाजासाठी विशेष आरोग्यसेवा पुरविणार व पोषण मिशन राबविणार

अल्पसंख्यांकांच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी 'सारथी'च्या धर्तीवर रफिक झकेरिया यांच्या नावे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणार

तांडा विकास महामंडळ स्थापन करणार

खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणारी 'महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) आणि 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था' या दोन्ही संस्थांच्या निधीत भरीव वाढ करणार

सर्व विकास महामंडळांच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्यवसाय कर्जाची मर्यादा वाढविणार

बंजारा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी १० लाख रुपये विनाव्याज कर्ज 'वसंतराव नाईक महामंडळा'तर्फे उपलब्ध करून देणार

महाराष्ट्राच्या भविष्याचा केला विचार - खर्गे

राज्याची निवडणूक देशासाठी महत्त्वपूर्ण असून, देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. त्यामुळे राज्याचे आणि देशाचे मुंबईकडे लक्ष आहे. आर्थिक, उद्योग, गुंतवणूक बाबींमध्ये महाराष्ट्र पुढे आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यास उत्तम प्रशासनाची हमी जाहीरनाम्यात देण्यात आली आहे, तर महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार अन् अभ्यास करून हा ‘महाराष्ट्रनामा’ तयार केल्याचे खर्गे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी काँग्रेसवर खोटेपणाचा आरोप करतात. मात्र, राज्यातील महायुती सरकार सपशेल अपयशी ठरली आहेत. महायुतीने राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक मार्गाने सत्ता स्थापन केल्याचा घणाघातही खर्गे यांनी चढवला. भाजपने खोके देऊन इतर पक्षांचे चिन्ह चोरले, पक्ष फोडले. आता त्यांना जागा दाखवून देऊ, असा इशारा खर्गे यांनी दिला.

मोदी महाराष्ट्रात येऊ नका- संजय राऊत

विधानसभा निवडणुकीत राज्यातील बेपर्वा सत्ताधाऱ्यांना हटवण्याचा निर्धार मविआने केला आहे. महाराष्ट्र कुणाचा कधी गुलाम झाला नाही आणि होणार नाही, असा इशारा शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिला. मोदी-शहा राज्यात तळ ठोकून आहेत. दिल्लीत ते कधी काम करतात हे कळत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच मोदी जेव्हा राज्यात येतात तेव्हा असुरक्षिततेची भावना होते. त्यामुळे त्यांनी राज्यात येऊ नये, असा सल्ला राऊत यांनी मोदींना दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र अद्याप कळलेला नाही. त्यांनी तो समजून घ्यावा. तसेच आधी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याबद्दल माफी मागावी, असे राऊत म्हणाले.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या