

ठाणे शहरातील शास्त्रीनगर परिसरातील मिलन हिल या १८ मजली निवासी इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन रहिवासी होरपळून जखमी झाले, तर इमारतीत अडकलेल्या ७० हून अधिक रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी (Yasin Tadvi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ४.१४ वाजता मिलन हिल इमारतीच्या १० व्या मजल्यावरील विद्युत डक्टमध्ये आग लागल्याची घटना घडली. ही आग १० ते १३ व्या मजल्यांदरम्यानच्या विद्युत डक्टमधून पसरली, त्यामुळे संपूर्ण इमारतीत धूर झाला.
७० हून अधिक जण अडकले
आगीमुळे झालेल्या प्रचंड धुरामुळे जवळपास ७० रहिवासी इमारतीत अडकले होते. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि सर्व अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, असे तडवी यांनी सांगितले.
दोघे वृद्ध रहिवासी जखमी
या घटनेत ६२ आणि ७४ वर्षांचे दोन रहिवासी भाजल्याने जखमी झाले. मिड-डेच्या वृत्तानुसार, ७४ वर्षीय रुचिरा देशमुख यांच्या दोन्ही हातांना भाजल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर ६२ वर्षीय विवेक प्रधान यांच्या हात आणि पायाला भाजल्याने त्यांना बेथानी हॉस्पिटलमध्ये (Bethany Hospital) दाखल करण्यात आले आहे.
मालमत्तेचे नुकसान, तपास सुरू
या आगीत विद्युत डक्टसह दोन फ्लॅट्सच्या मुख्य दरवाजे जळालेत. अग्निशमन दलाने तासाभरानंतर साधारण सकाळी ५.३० वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
दरम्यान, आग कशी लागली याबाबत तपास सुरू आहे.