महाराष्ट्र

८७ विधानसभा मतदारसंघांत दोन ईव्हीएम लागणार; राज्य निवडणूक आयोगाची माहिती

यंदाची विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगाची कसोटी बघणारी ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने ईव्हीएमची संख्या वाढवावी लागणार आहे.

रविकिरण देशमुख

मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगाची कसोटी बघणारी ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने ईव्हीएमची संख्या वाढवावी लागणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ पैकी ८७ मतदारसंघात यंदा मतदान केंद्रांमध्ये दोन ईव्हीएम लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), मनसे, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे), बहुजन वंचित आघाडी, रिपाइं आदी विविध पक्ष उतरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी निवडणूक रिंगणात किती उमेदवार आहेत याची यादी जाहीर झाली.

मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात सर्वाधिक २२ उमेदवार, तर सर्वात कमी ६ उमेदवार चेंबूर व माहीम मतदारसंघात आहेत.

राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, १६ पेक्षा अधिक उमेदवार ज्या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. तेथे दोन ईव्हीएम लागणार आहेत. राज्यातील ८७ मतदारसंघात १६ पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे तेथे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम लागतील. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, २८८ मतदारसंघात ४,१४० उमेदवार रिंगणात आहेत. तर २,९३८ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. यंदा ७०७८ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत ५,५४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ३,२३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे सर्वात कमी तीन, तर नांदेड दक्षिण मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात होते.

शहादात सर्वात कमी, तर माजलगावात सर्वाधिक उमेदवार

शहादा (अनुसूचित जाती) मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे तीन उमेदवार आहेत, तर बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत.

मतदारांची कसोटी

मतदारांना मत देण्यापूर्वी ईव्हीएमवर उमेदवाराचे नाव व पक्षचिन्ह तपासून पाहावे लागणार आहे. उमेदवाराचे नाव तपासताना मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मत देताना विलंबही लागू शकतो.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी