नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्याच्या प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची त्वरित बदली करण्याचे आदेश सोमवारी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले. दरम्यान, रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात कुठलेही काम देऊ नये, अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी करून त्यांची पदावरून उचलबांगडी करण्याची सातत्याने मागणी केली होती.
रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार सेवाज्येष्ठतेत अग्रस्थानी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याकडे सुपूर्द करावा, असा आदेश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे. पुढील पोलीस महासंचालकांची नियुक्ती करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील तीन अधिकाऱ्यांची नावे मंगळवार दुपारपर्यंत पाठवावी, असा आदेशही निवडणूक आयोगाने दिला आहे.
निवडणूक आयोगाने अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीच्या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. अधिकाऱ्यांनी केवळ नि:पक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणेच नव्हे, तर कर्तव्य बजावताना तुमच्याकडे प्रामाणिक अधिकारी म्हणून पाहिले जाईल, अशा दृष्टिकोनातून आपले वर्तन असले पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या.
पवार, ठाकरे, पटोले यांच्याकडून स्वागत
पोलीस महासंचालकांची त्वरित बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्याचे राष्ट्रवादी (शप) काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला आहे, अशा प्रकारची व्यक्ती इतक्या महत्त्वाच्या पदावर असू नये, असे शरद पवार यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. शुक्ला यांची पदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी काँग्रेसने तीन वेळा निवडणूक आयोगाकडे केली होती.
शुक्ला भाजपला मदत करीत असल्याचा आरोप
रश्मी शुक्ला भाजपला मदत करीत होत्या आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचे दूरध्वनी टॅप करीत होत्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्ही तक्रारी केल्या होत्या. अशा प्रकारच्या अधिकाऱ्याची इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करणे योग्य नाही, अशी मागणीही आम्ही केली होती, असे पटोले म्हणाले. तथापि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्ला यांना स्वत:च्या राजकीय लाभासाठी दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली, असे ते म्हणाले.
मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार
राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे.