संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

मनोज जरांगे-पाटील यांची अचानक माघार; कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला पाठिंबा नाही

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणाला विजयी करावयाचे आणि कोणाला पराभूत करावयाचे याचा निर्णय मराठा समाजातील मतदार घेतील...

Swapnil S

जालना : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कोणाला विजयी करावयाचे आणि कोणाला पराभूत करावयाचे याचा निर्णय मराठा समाजातील मतदार घेतील, असे स्पष्ट करून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेपासून सोमवारी घूमजाव केले आणि आपण कोणत्याही उमेदवाराला अथवा पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर मराठा समाजातील ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी ते मागे घ्यावेत, असे आदेश त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दिले.

समाजातील नेते, कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून जरांगे यांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेत बदल केला आणि निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचे ठरविले. कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडावयाचे आणि कोणत्या मतदारसंघातील उमेदवारांना वियजी करावयाचे याची रणनीतीही जरांगे यांनी ठरविली होती.

मराठा समाज निर्णय घेईल!

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे वार्ताहरांना सांगितले की, सर्व संबंधितांशी सविस्तर चर्चा करून आपण निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाला विजयी करावयाचे आणि कोणाला पराभूत करावयाचे याचा निर्णय मराठा समाज घेईल. कोणताही उमेदवार अथवा राजकीय पक्षाशी आपण संलग्न नाही, सत्तारूढ महायुती अथवा विरोधी महाविकास आघाडी यापैकी कोणाकडूनही आपल्यावर दबाव आलेला नाही, असे जरांगे म्हणाले.

लेखी, व्हिडीओ आश्वासन

मराठ्यांच्या प्रश्नांशी ज्यांची बांधिलकी आहे, अशा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावयाचा याचा निर्णय मराठा समाज घेईल, असे स्पष्ट करताना जरांगे यांनी उमेदवारांकडून मराठा समाजाचे हित जपण्याबाबतचे लेखी अथवा व्हिडीओच्या स्वरूपामध्ये आश्वासन घेण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित केले.

निवडणुकीनंतर मराठा आंदोलन सुरू राहणार

निवडणुकीतून माघार घेण्यावाचून आमच्याकडे अन्य पर्याय नव्हता. आम्हाला राजकीय क्षेत्राचा दीर्घ अनुभव नाही, इच्छुकांनी आपले अर्ज मागे घ्यावे, अशी आपली त्यांना विनंती आहे. निवडणुकीनंतर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहील, मराठा समाजाच्या पाठिंब्याविना एकही उमेदवार विजयी होऊ शकणार नाही. मराठा समाजाने कोणत्याही निवडणूक सभेला हजर राहू नये अथवा एखाद्या राजकीय पक्षामागे वाहत जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. ज्यांनी मराठा समाजाचा छळ केला त्याला मतदानातून धडा शिकवा, असेही ते म्हणाले.

आनंद झाला - पवार

मनोज जरांगेंनी हा चांगला निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. पूर्वीचा निर्णयही (निवडणूक लढवण्याचा) त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचे एकच कारण आहे, ते सतत सांगत आहेत भाजपला आमचा विरोध आहे. ते भाजपविरोधात लढले असते तर त्याचा फायदा भाजपलाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे, असे पवार म्हणाले. महाविकास आघाडीचा दबाव होता म्हणून मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ची डेडलाईनच का? हायकोर्टाचा EC ला सवाल, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

शेलार यांची हॅटट्रिक की काँग्रेसचे पुनरागमन? वांद्रे पश्चिमेत महायुती आणि मविआ यांच्यात थेट लढत

‘बेस्ट’च्या बोनससाठी महापालिकेचे ८० कोटी; आता निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा

काही तलवारी म्यान, तर काहींची धार कायम! एकूण २,९३८ उमेदवारी अर्ज मागे; ४,१४० उमेदवार रिंगणात

रश्मी शुक्ला यांची अखेर उचलबांगडी; मविआ नेत्यांच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगाचे आदेश