महाराष्ट्र

अजितदादांच्या यादीत चारच लाडक्या बहिणी; राष्ट्रवादी काँग्रेसचे ३८ उमेदवार जाहीर

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हेच रिंगणात उतरणार आहेत. तसेच येवल्यातून छगन भुजबळ, तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या ३८ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत केवळ चारच महिलांना तिकीट दिल्याने अजितदादांच्या केवळ चारच लाडक्या बहिणी आहेत का, अशी खोचक टीका ‘मविआ’कडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हेच रिंगणात उतरणार आहेत. तसेच येवल्यातून छगन भुजबळ, तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या या यादीमध्ये नवाब मलिक आणि सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही, मात्र बहुतांश विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विद्यमान मंत्र्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचा यादीत समावेश आहे.

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, निफाडचे आमदार दिलीप बनकर व पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे या विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे, तर पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात सुनील टिंगरे यांचे नाव गुंतल्याने महायुतीला ते अडचणीचे ठरणारे होते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अर्जुनी मोरगाव, इगतपुरी, अमरावती शहर, नवापूर, पाथरी, मुंब्रा - कळवा या सहा ठिकाणी फक्त नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. इतर ३२ उमेदवारांमध्ये ९ मंत्र्यांसह विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

या महिलांना उमेदवारी

अजित पवारांनी श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, नाशिक देवळालीतून सरोज आहिरे, अमरावती शहरातून सुलभा खोडके आणि पाथरी येथून निर्मला उत्तमराव विटेकर या महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.

शिंदे, फडणवीस, अजितदादा दिल्लीत

महायुतीमध्ये जागावाटपावरून अजूनही तोडगा निघू शकला नाही. हा तोडगा राज्यात न सुटल्याने अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे या दिल्ली भेटीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचे १८२ उमेदवार जाहीर

भाजपने पहिल्या यादीत ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ३८ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीने आतापर्यंत २८८ पैकी १८२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार यांनी आधी ‘देवगिरी’ बंगल्यावर बोलवून काही उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले होते. आता महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत असलेल्या जागांवर तिन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, अद्याप १०६ जागांवर उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी

बारामती - अजित पवार

येवला - छगन भुजबळ

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील

कागल - हसन मुश्रीफ

परळी - धनंजय मुंडे

दिंडोरी - नरहरी झिरवाळ

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

श्रीवर्धन - आदिती तटकरे

अमळनेर - अनिल भाईदास पाटील

उदगीर - संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

माजलगाव - प्रकाश सोळंके

वाई - मकरंद पाटील

सिन्नर - माणिकराव कोकाटे

खेड आळंदी - दिलीप मोहिते

अहमदनगर शहर - संग्राम जगताप

इंदापूर - दत्तात्रय भरणे

अहमदपूर - बाबासाहेब पाटील

शहापूर - दौलत दरोडा

पिंपरी - अण्णा बनसोडे

कळवण - नितीन पवार

कोपरगाव - आशुतोष काळे

अकोले - डॉ. किरण लहामटे

वसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळूण - शेखर निकम

मावळ - सुनिल शेळके

जुन्नर - अतुल बेनके

मोहोळ - यशवंत माने

हडपसर - चेतन तुपे

देवळाली - सरोज अहिरे

चंदगड - राजेश पाटील

इगतपुरी - हिरामण खोसकर

तुमसर - राजू कारेमोरे

पुसद - इंद्रनील नाईक

अमरावती शहर - सुलभा खोडके

नवापूर - भरत गावित

पाथरी - निर्मला उत्तमराव विटेकर

मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला

‘मविआ’चे समान जागावाटप; काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट प्रत्येकी ८५ जागा लढवणार, १८ जागा मित्रपक्षांना, १५ जागांबाबत उत्सुकता

ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवे चेहरे; पहिल्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा, मुंबईतील १३ उमेदवारही जाहीर

शिंदेंचाही घराणेशाहीवर भरवसा; ४५ उमेदवार जाहीर, माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर!

भरगच्च गर्दीत चढणं जीवावर बेतलं; कर्जत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान घटना

मुस्लिमांच्या विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा! एकापेक्षा अधिक विवाहांच्या नोंदणीला कायद्याचा अडसर नाही; न्यायालयाचा निर्वाळा