महाराष्ट्र

आजच्या दिवशी मतदारराजा; राज्यात ९ कोटी ७० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Maharashtra assembly elections 2024 : गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या झंझावाती प्रचारानंतर आता बुधवारी मतदान होणार असून, एक दिवसाचा ‘राजा’ असलेला मतदारराजा रथीमहारथींचे भवितव्य निश्चित करणार आहे.

Swapnil S

मुंबई : गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या झंझावाती प्रचारानंतर आता बुधवारी मतदान होणार असून, एक दिवसाचा ‘राजा’ असलेला मतदारराजा रथीमहारथींचे भवितव्य निश्चित करणार आहे. राज्यात गेली अडीच वर्षे सुरू असलेला गलिच्छ राजकारणाचा चिखल साफ करण्याची मोठी जबाबदारी मतदारराजावर आहे. त्यामुळे यावेळी मतदान करताना मतदारांची कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण १५८ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ६ मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत.

राज्यातील २८८ मतदारसंघांत तब्बल ४,१३६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बुधवारी बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गेला महिनाभर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यात प्रचाराचा धडाका लावला होता. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या सहा मुख्य पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने सर्वपक्षीय नाराजांनी बंडाचे हत्यार उपसत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील काही बंडखोरांचे भवितव्यही या निवडणुकीत ठरणार आहे.

मविआ, महायुतीत चुरस

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा भाग आहेत, तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस

पक्ष (शप) हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. या दोन आघाड्यांमध्ये या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे बुधवारी निश्चित होणार आहे.

राज्यातील लक्षवेधी लढती

बुधवारच्या मतदानात शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे, नितेश राणे या नव्या पिढीबरोबरच अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे भवितव्य ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला ४४, तर राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या.

मतदारसंघ : २८८

एकूण उमेदवार : ४,१३६

पुरुष उमेदवार : ३,७७१

महिला उमेदवार : ३६३

तृतीयपंथी उमेदवार : २

मतदारांची संख्या

पुरुष - ५,००,२२,७३९

महिला - ४,६९,९६,२७९

तृतीयपंथी - ६,१०१

एकूण - ९,७०,२५,११९

दिव्यांग मतदार

पुरुष - ३,८४,०६९

महिला - २,५८,३१७

तृतीयपंथी - ३९

एकूण - ६,४१,४२५

मतदानाची वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ