महाराष्ट्र

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ची डेडलाईनच का? हायकोर्टाचा EC ला सवाल, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची डेडलाईन दुपारी १२ किंवा १ वाजताची का ठेवली नाही? कार्यालयीन कामकाज सुरू होते, तीच ११ वाजताची डेडलाईन ठेवण्यामागील नेमका हेतू काय ते सांगा. याबाबत एका दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करून खुलासा करा, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावले.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सकाळी अकरानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज फेटाळणाऱ्या निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्य खंडपीठाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजताची डेडलाईन का? सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे अर्ज नेमके कोणत्या आधारे फेटाळण्यात आले, असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने निवडणूक आयोगाला तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

वांद्रे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकिफ अहमद दफेदार यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कारण देण्यात आल्याने अधिकाऱ्याच्या निर्णयाला आक्षेप घेत आकिफ अहमद दफेदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंउपीठासमोर सुनावणी झाली. केवळ सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून निवडणूक आयोग उमेदवारी अर्ज फेटाळू शकत नाही. कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारलेच पाहिजेत, असा दावा दफेदार यांच्या वकिलांनी केला. तर आयोगाच्या वतीने अ‍ॅड. अक्षय शिंदे यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला. याचिकाकर्त्या उमेदवाराने अर्जामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच आर्थिक तपशील दिला नाही. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. तुम्ही इतर तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची डेडलाईन दुपारी १२ किंवा १ वाजताची का ठेवली नाही? कार्यालयीन कामकाज सुरू होते, तीच ११ वाजताची डेडलाईन ठेवण्यामागील नेमका हेतू काय ते सांगा. याबाबत एका दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करून खुलासा करा, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला बजावले. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३० ऑक्टोबरची शेवटची तारीख होती. या दिवशी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून उमेदवारी फेटाळलेल्या राज्यभरातील उमेदवारांची यादी सादर करा, असा आदेशही खंडपीठाने दिला.

शेलार यांची हॅटट्रिक की काँग्रेसचे पुनरागमन? वांद्रे पश्चिमेत महायुती आणि मविआ यांच्यात थेट लढत

‘बेस्ट’च्या बोनससाठी महापालिकेचे ८० कोटी; आता निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा

काही तलवारी म्यान, तर काहींची धार कायम! एकूण २,९३८ उमेदवारी अर्ज मागे; ४,१४० उमेदवार रिंगणात

रश्मी शुक्ला यांची अखेर उचलबांगडी; मविआ नेत्यांच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगाचे आदेश

मनोज जरांगे-पाटील यांची अचानक माघार; कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला पाठिंबा नाही