सेक्सटॉर्शन प्रकरणात नवा ट्विस्ट; भाजप आमदाराला ब्लॅकमेल करणारी ‘महिला’ नव्हे तर 'बेरोजगार तरुण'  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

सेक्सटॉर्शन प्रकरणात नवा ट्विस्ट; आमदाराला ब्लॅकमेल करणारी ‘महिला’ नव्हे तर 'बेरोजगार तरुण'

कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे ५५ वर्षीय आमदार शिवाजी पाटील यांनी, एक महिला अश्लील चॅट्स आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. अटक केलेल्या आरोपीने सुमारे सहा महिन्यांपूर्वी नोकरीसाठी आमदारांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती, परंतु त्याला काम मिळाले नाही.

Krantee V. Kale

सेक्सटॉर्शन प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. एक महिला अश्लील चॅट्स आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे ५५ वर्षीय आमदार शिवाजी पाटील यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र ती ‘महिला’ नव्हे तर २६ वर्षीय बेरोजगार तरुण असून, त्याला स्त्रियांचे आवाज हुबेहूब काढण्याची कला अवगत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ठाण्याच्या चितळसर पोलिसांनी चंदगडमधील बेरोजगार तरुण मोहन ज्योतीबा पवार याला आमदाराकडून ५ ते १० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. महिला असल्याचे भासवून आरोपीने बनावट व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

डिजिटल पुराव्यांवरून काढला आरोपीचा माग

पोलिसांच्या माहितीनुसार, आमदार पाटील हे ठाणे आणि त्यांच्या कोल्हापूर मतदारसंघात वारंवार ये-जा करीत असतात. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती की, एक “अज्ञात महिला” त्यांना अश्लील साहित्य व्हायरल करण्याची धमकी देत त्रास देत आहे. त्यानंतर सायबर पथकाने तपास सुरू केला आणि डिजिटल पुराव्यांचा मागोवा घेताच संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.

कॉल रेकॉर्ड, बँक खात्याचे तपशील आणि IP अ‍ॅड्रेसच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा चंदगड येथे लावला. चौकशीसाठी बोलावल्यावर पवार याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पवार हा शेतकरी कुटुंबातील असून नुकताच बी.एस्सी. पदवीधर झाला आहे आणि गेल्या सहा महिन्यांपासून बेरोजगार आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पवार याने सुमारे सहा महिन्यांपूर्वी नोकरीसाठी आमदारांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती, परंतु त्याला काम मिळाले नाही. “तो आर्थिक अडचणीत होता आणि स्त्रियांचे आवाज काढण्याच्या कौशल्याचा गैरवापर करून आमदाराला अडकवण्याचा कट रचण्याचा निर्णय घेतला,” असे अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

आरोपी पवार यापूर्वी लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. तिथे तो स्त्रियांचे हुबेहुब आवाज काढून सहकाऱ्यांचे मनोरंजन करायचा, असे पोलिसांनी सांगितले. पवारविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३) (खंडणी) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ अंतर्गत (इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील साहित्य प्रसारित करणे) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आमदाराला केवळ आर्थिक कारणांसाठी लक्ष्य करण्यात आले होते आणि प्रत्यक्षात कोणत्याही अश्लील साहित्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास