एकनाथ शिंदे  संग्रहित फोटो
महाराष्ट्र

बडी नावे वगळण्यावरून शिवसेनेत धुसफूस; शपथविधीबाबत अखेरपर्यंत संभ्रम

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनात आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू असली तरी मंत्र्यांच्या यादीवरून महायुतीमधील धुसफूस शनिवारी उशिरापर्यंत कायम होती.

Swapnil S

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनात आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू असली तरी मंत्र्यांच्या यादीवरून महायुतीमधील धुसफूस शनिवारी उशिरापर्यंत कायम होती. शिवसेनेने काही नावे वगळूनही पेच कायम राहिल्याने शपथविधी वेळेवर पार पडेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेमके किती आणि कोणते चेहरे मंत्रिमंडळात असणार, याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू होती. शिंदे गटाने तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकर ही नावे वगळावीत, अशा सूचना भाजप नेतृत्वाकडून केल्याची चर्चा आहे. ही नावे वगळली तरी तीन नव्या नावांबाबत पुन्हा काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवसेना ही नावे वगळून सहभागी होणार का, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क केले जात होते.

राजकीय सूत्रांच्या मते प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि राजेश क्षीरसागर यांची नावे नव्या यादीत पाठवण्यात आली होती. पण यातील पहिल्या तीन नावापुढे फुली मारण्यात आल्याचे वृत्त पसरले. उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या परीने भाजप नेतृत्वाचे मन वळविण्याचे प्रयत्न करत होते. त्यात कितपत यश आले हे उद्या शपथविधी होत असतानाच कळेल, असे या पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नागपूरच्या राजभवनात तब्बल ३३ वर्षांनंतर शपथविधी सोहळा पार पडत आहे. या आधी २२ डिसेंबर १९९१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ, राजेंद्र गोडे या दोन बंडखोर शिवसैनिकांचा शपथविधी मोठ्या तणावपूर्ण वातावरणात पार पडला होता. भुजबळ यांनी मंत्रिपदाची तर गोडे यांनी उपमंत्री म्हणून शपथ घेतली होती. याशिवाय जयदत्त क्षीरसागर, वसुधा देशमुख, भरत बाहेकर या काँग्रेस आमदारांचाही समावेश उपमंत्री म्हणून करण्यात आला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात कोण चेहरे असावेत, याबाबत काही निकष पाळले जात असल्याने महायुतीतील वातावरण सध्या गरम असल्याचे म्हटले जात आहे.

बडे नेते शिंदेंच्या भेटीला

नाव वगळले जाणार असल्यामुळे शिवसेना शिंदे गटातील काही बडे नेते शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर पोहोचले. मात्र एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना तब्बल पाच तास वेटिंगवर ठेवल्याची चर्चा रंगली आहे. संजय शिरसाट, विजय शिवतारे, तानाजी सावंत, योगेश कदम आणि केसरकर हे शिंदेंच्या भेटीसाठी गेले होते. त्यातच मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याच्या भीतीने संजय राठोड आणि शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल