मुंबई : यंदा समाधानकारक पाऊस बरसला नसल्याने राज्यातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यातील ३ हजार ४२ धरणांमध्ये १७ नोव्हेंबर २०२६ रोजी केवळ ६४ टक्के म्हणजेच ९२३.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये ९० टक्के म्हणजेच १३०९.९३ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षाच्या तुलनेत तब्बल ३८६.३३ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
विशेष म्हणजे, राज्यातील लहान धरणांमध्ये अवघा ३८ टक्के, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ५७ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७१ टक्के पाणी असले तरी मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. मोठ्या धरणांमध्ये ७२४.२८ टीएमसी, मध्यम धरणांमध्ये ११६.४२ टीएमसी, तर लघु धरणांमध्ये ८२.९१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये ९६ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ८२ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये ७० टक्के पाणीसाठा होता.
मोडक सागरचा जलस्तरही खालावला
मुंबईच्या पाण्याबाबत दिलासादायक बाब म्हणजे भातसा, तानसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक साठा आहे. मात्र, मोडकसागर धरणात अवघा ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन, गळती रोखणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक ठरणार आहे.
मराठवाड्यातील स्थिती विशेष चिंताजनक
महसूल विभागनिहाय विचार करता कोकण विभागात सर्वाधिक ८१ टक्के, पुणे विभागात ७५ टक्के आणि नाशिक विभागात ७४ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ५६ टक्के, अमरावती विभागात ५२ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी ३६ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील जालना, धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांमधील पाणीसाठ्याची स्थिती विशेष चिंताजनक आहे.