पूनम अपराज/मुंबई
खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘पोलीस’ नावाच्या पाट्या आणि लाल रंगातील लिखाणावर राज्यभरात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सखाराम आर. कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाट्यांच्या वाढत्या गैरवापराबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही तीव्र चिंता व्यक्त केली असून अशा उल्लंघनांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र मोटर वाहन नियम’ १९८९ च्या नियम १३३(६) आणि ‘मोटर वाहन कायदा’ १९८८ च्या कलम १७७ अन्वये वाहनचालक आणि मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी वाहनांवर ‘पोलीस’ असा फलक असल्यास अशी वाहने नेहमीच्या सुरक्षा तपासणीतून सहज निसटतात, असा इशारा परिपत्रकात देण्यात आला आहे. यामुळे बेकायदेशीर किंवा प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करण्यासाठी या वाहनांचा गैरवापर होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. तसेच अंमलबजावणी यंत्रणांकडून ही वाहने अडवली जाण्याची शक्यता कमी असल्याने गैरकायदेशीर कृत्यांसाठी अशी वाहने भाड्याने घेतली जाण्याची किंवा वापरली जाण्याची शक्यता असते. या सर्व बाबी विचारात घेऊन अनधिकृतपणे पोलीस पाटी किंवा लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहून फिरणाऱ्या खासगी वाहनांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परिपत्रक सर्व प्रमुखांकडे सादर
या संदर्भातील परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच महामार्ग पोलीस यंत्रणेला पाठविण्यात आले असून, त्यानुसार आवश्यक ती अंमलबजावणी आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.