

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरात लग्नसमारंभातील जेवणानंतर नवविवाहित दाम्पत्यासह २७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (दि. १) नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये हा लग्नसमारंभ पार पडला. या समारंभात जेवण केल्यानंतर काही पाहुण्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी केटरिंग व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा आरोप करत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लग्नाच्या जेवणानंतर उलट्या, जुलाबाचा त्रास
नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये १ नोव्हेंबर रोजी लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला जवळपास ४०० पाहुणे उपस्थित होते. मात्र, जेवणाच्या शेवटच्या पंगतीत जेवलेल्या सुमारे २७ ते ३० जणांना अचानक त्रास सुरू झाला. यामध्ये नवविवाहित वधू-वरांचाही समावेश असल्याचे वृत्त 'एआय'ने दिले आहे. बाधितांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रुग्णांना मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयात, तर काहींना मुलुंडच्या कामगार रुग्णालयात आणि विक्रोळीतील पालिका रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी दिली रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती
एम. टी. अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एकूण २७ जणांना दाखल करण्यात आले होते. यामध्ये ११ महिला, ९ पुरुष आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. लग्नसमारंभातील जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. सर्व रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
केटरिंग व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा आरोप; तुकाराम मुंढेंकडे चौकशीची मागणी
या घटनेनंतर वधू-वरांच्या नातेवाईकांनी केटरिंग कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुंबई पोलिसांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच, संबंधित केटरिंग व्यावसायिकाची चूक आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार, लग्नसमारंभाच्या शेवटी पाहुण्यांना खवा देण्यात आला होता. तो खाल्ल्यानंतर पाहुण्यांना त्रास सुरू झाल्याचा आरोप एका नातेवाईकाने केला आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.