मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. विरार-चर्चगेट फास्ट लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे त्यांच्या नकळत फोटो आणि व्हिडीओ काढून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या फोटो आणि व्हिडीओमध्ये AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बदल करून अश्लील स्वरूपातील सामग्री तयार केली आणि ती इंस्टाग्रामवर शेअर केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ३१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद साबिर मोहम्मद रुस्तम असे आहे. तो वसई पूर्व येथे राहत असून मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा आहे. तो व्यवसायाने शिंपी असल्याची माहिती आहे. दक्षिण सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोनही जप्त केला असून त्यात अनेक महिलांचे त्यांच्या परवानगीशिवाय काढलेले फोटो आणि व्हिडीओ आढळल्याचे वृत्त आहे.
१९ वर्षीय तरुणीचा व्हिडीओ अश्लील गाण्यासह केला अपलोड
२२ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजून ३५ मिनिटांनी विरार-चर्चगेट फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून एक १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत प्रवास करत होती. यावेळी आरोपीने तिचे गुपचूप चित्रीकरण केले. त्यानंतर २७ जून रोजी या तरुणीचा व्हिडीओ अश्लील गाण्यासह इंस्टाग्रामवर रीलच्या स्वरूपात अपलोड करण्यात आला. या रीलला १ लाख ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुणीने १९ ऑक्टोबर रोजी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
AI च्या मदतीने अश्लील फोटो-व्हिडीओ तयार केल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासात आरोपीने महिलांचे गुपचूप काढलेले फोटो आणि व्हिडीओ AI अॅप्लिकेशनच्या मदतीने बदलून अश्लील स्वरूपातील सामग्री तयार केल्याचे समोर आले. त्यानंतर ही सामग्री इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आली. आरोपीने 'Playboy' नावाचे बनावट अकाउंटही तयार केले होते. या अकाउंटच्या प्रोफाइल फोटोसाठी एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आल्याचे तपासात आढळले.
सुरुवातीला आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडे ठोस माहिती नव्हती. मात्र, तांत्रिक तपास आणि विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक केली.
मुंबई पोलिसांचे प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी लोकल ट्रेन, रेल्वे स्थानक किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी महिलांचे गुपचूप फोटो अथवा व्हिडीओ काढणारी व्यक्ती आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारची माहिती रेल्वे पोलिसांना द्यावी किंवा आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तसेच, अश्लील, मॉर्फ केलेले किंवा AI च्या मदतीने तयार केलेले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पुढे पाठवू नयेत किंवा शेअर करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. अशा सामग्रीविरोधात सायबर क्राईम हेल्पलाइन १९३०, राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करता येते. तक्रारदार महिलांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.