Latur : टेम्पोतून कुरिअरचं पार्सल उतरवताना अचानक स्फोट; कर्मचारी गंभीर जखमी; CCTV मध्ये थरार कैद

लातूरमध्ये टेम्पोतून कुरिअरचं पार्सल उतरवत असताना अचानक जोरदार स्फोट झाला. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, स्फोटाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Latur : टेम्पोतून कुरिअरचं पार्सल उतरवताना अचानक स्फोट; कर्मचारी गंभीर जखमी; CCTV मध्ये थरार कैद
Published on: 

लातूर : कुरिअर कंपनीच्या टेम्पोतून पार्सल उतरवण्याचं काम सुरू असताना अचानक एका पार्सलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. शनिवारी (दि. ३१) सकाळी शहरातील उद्योग भवन परिसरात झालेल्या या स्फोटात एक कर्मचारी गंभीररीत्या भाजून जखमी झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यामध्ये एक व्यक्ती टेम्पोतून पार्सल उतरवत असताना अचानक स्फोट झाल्याचं दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पार्सलमध्ये नेमकं काय होतं, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पार्सल उतरवताना अचानक स्फोट

माध्यमांच्या वृत्तानुसार, लातूर शहरातील विलासराव देशमुख मार्गावरील उद्योग भवन परिसरात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या भागात अनेक खासगी कुरिअर कंपन्यांची कार्यालयं आणि दुकानं आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी कुरिअरची पार्सल घेऊन एक मालवाहू टेम्पो दुकानासमोर आला होता. टेम्पोमधून पार्सलचे बॉक्स खाली उतरवण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी एका पार्सलमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून आसपासचे दुकानदार आणि नागरिक घाबरले. परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं?

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून, त्यात स्फोटाचा क्षण कैद झाला आहे. फुटेजमध्ये एक व्यक्ती टेम्पोमधून पार्सल उतरवण्याचं काम करताना दिसते. मात्र, हे काम सुरू असतानाच अचानक स्फोट होतो. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पार्सलमध्ये कोणती वस्तू होती, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कर्मचारी गंभीर भाजला

माध्यमांच्या वृत्तानुसार, स्फोटाच्या वेळी पार्सल हाताळणारा कर्मचारी गंभीररीत्या भाजला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. स्फोटानंतर आग पसरली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचंही वृत्त आहे. मात्र, या घटनेमुळे कुरिअरमधून पाठवण्यात येणाऱ्या वस्तूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Latur : टेम्पोतून कुरिअरचं पार्सल उतरवताना अचानक स्फोट; कर्मचारी गंभीर जखमी; CCTV मध्ये थरार कैद
पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का? दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू; वाचवायला गेलेले दोघेही जखमी

पार्सलमध्ये नेमकं काय होतं?

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस, बॉम्बशोधक पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पार्सल कुठून आणि कोणाला पाठवण्यात आलं होतं, तसेच त्यात नेमकं काय होतं, याचा तपास सुरू आहे. स्फोटाचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी करत आहेत. तपासानंतरच पार्सलमध्ये काय होतं आणि स्फोट कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)