मंत्र्यांना पाहणीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश; दुष्काळावर इलाजाची तयारी सुरू (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

मंत्र्यांना पाहणीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश; दुष्काळावर इलाजाची तयारी सुरू

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे.

Swapnil S

नागपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागात तातडीने प्राथमिक पाहणी करून आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत या गंभीर परिस्थितीवर सखोल चर्चा झाली आहे. पुढील आठवड्याभरात सर्व जिल्ह्यांतील प्राथमिक आढावा पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच पिकांचे अधिकृत पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत पुरवली जाईल.

कर्जमाफीच्या अंमलबजावणी-बाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत कर्जमाफीच्या तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित याद्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यासोबतच बाधित भागांत पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची योग्य व्यवस्था केली जाईल.

हवामान विभागाची आकडेवारी

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून ९ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात पोहोचला होता. मात्र, ४ जून ते १९ सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात सर्वाधिक म्हणजे २९ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्र याच प्रदेशाचा भाग आहे.

वैरण, अतिरिक्त वीजपुरवठा

एल निनोमुळे ओढवणाऱ्या संभाव्य संकटाची पूर्वकल्पना असल्याने राज्य सरकारने आधीच 'वैरण विकास कार्यक्रम' सुरू केला आहे, ज्याद्वारे चाराटंचाईवर मात केली जात आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी संध्याकाळच्या वेळी अतिरिक्त वीज पुरवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

काजू-बदामांबाबत नाराजी

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरकारी बैठकीत नेत्यांना खाण्यासाठी काजू आणि बदामांची व्यवस्था करण्यात आली होती. या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाने याबाबत संवेदनशील राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बैठकांमध्ये प्रशासन ड्रायफूट आणून ठेवते, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. पण, असे कोणीतरी जाणीवपूर्वक करत आहे, हे म्हणणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम

आजचे राशिभविष्य, २० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ganeshotsav 2026 : तळलेले मोदक २ दिवस राहतील कुरकुरीत; पिठात मिसळा हा १ पदार्थ

आईची साडी, जुन्या आठवणी अन् शिवानी रांगोळेचा मोहक लूक; पाहा खास फोटो

Ganeshotsav 2026 : मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय? बनवा ओल्या नारळाची स्वादिष्ट करंजी, नोट करा सोपी रेसिपी