Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम

अतिक्रमणमुक्त फुटपाथ कारवाईला वेग आला असतानाच आता मुंबईतील बेकायदा झोपड्यांवर येत्या एक ऑक्टोबरपासून बुलडोझर फिरवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम
Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : अतिक्रमणमुक्त फुटपाथ कारवाईला वेग आला असतानाच आता मुंबईतील बेकायदा झोपड्यांवर येत्या एक ऑक्टोबरपासून बुलडोझर फिरवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईत २ लाख २३ हजार १५० झोपड्या असून यापैकी ३९ हजार १११ झोपड्यांची उंची १४ फूट व त्यापेक्षाही अधिक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्या मार्गदर्शनात, सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने, ही मोहीम आखली जात आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत स्थित आहेत.

दरम्यान, ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. ६११ झोपड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

१४० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त होणार!

दरम्यान, अनधिकृत बृहन्मुंबईतील बांधकामांविरोधात महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) सातत्याने कारवाई सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तर, १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. तरी नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत तसेच अशाप्रकारचे बांधकाम केले असल्यास ते स्वतःहून तात्काळ हटवावेत. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

स्वतःहून पाडा, अन्यथा कारवाई

या उंचीच्या झोपड्या रहिवाशांनी स्वतः हून पाडाव्यात अन्यथा मुंबई महापालिका कारवाई करील असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे. यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in