मुंबई : थर्टी फर्स्टचा जल्लोष, नवीन वर्षांचे स्वागत यात जनतेसह पर्यटक न्हाऊन निघतात. थर्टी फर्स्ट अन् नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी बहुतांश लोक हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. मात्र हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाचे, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हे विशेष अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहे.
३१ डिसेंबर रोजी २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि २०२६ या नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी पर्यटक ३१ डिसेंबर रोजी रात्रभर जल्लोष करतात. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टचा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन अन्नपदार्थांचा आस्वाद घेत असतात. या दिवशी अन्नपदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. या दिवशी ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिले जाऊ नये, यासाठी एफडीएच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम शहरासह ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील उपहारगृह व हॉटेलांसाठी राबविण्यात येणार आहे. मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने उपस्थित होते.
गुटखा विकताना सापडल्यास थेट मकोका
गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि सूत्रधारांवरच ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय झिरवाळ यांनी घेतला आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
... तर अशी होईल कारवाई!
या अभियानात आवश्यकतेनुसार अन्नांचे नमुने घेतले जातील. त्रुटी आढळल्यास, हॉटेलला तत्काळ सुधारणा नोटीस आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांनी फेरतपासणी केली जाईल. सुधारणा न करणाऱ्या हॉटेलचा परवाना तत्काळ निलंबित किंवा रद्द करण्यात येईल, असा इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
...तर शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई
माणसे जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देऊन त्याला रंग आणि केमिकल वापरून सुगंधित केले जात आहेत. यात अनेक अधिकारी सहभागी आहेत. दोषी अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.