मुंबई : राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील खाणावळी किंवा कॅन्टीनमध्ये अन्नपदार्थ सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही? याची तपासणी करण्याची विशेष मोहीम ‘एफडीए’ लवकरच हाती घेणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ‘शैक्षणिक संस्थांमधील उपाहारगृहांची तपासणी मिशन मोडवर असून पुढील ८ ते १० दिवसांत याचे परिणाम दिसतील’ , असे तुकाराम मुंढे यांनी ‘एएनआय’शी बोलताना स्पष्ट केले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने मागील काही दिवसांपासून राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे होती घेतल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे. अनेक ठिकाणी भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचे जेवण अशा अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंढे यांच्या या धडाकेबाज कामामुळे त्यांची मोठी चर्चा सुरू असतानाच आता त्यांनी आपला मोर्चा शाळा आणि महाविद्यालयांच्या दिशेने वळवल्याचे दिसत आहे.
‘एफडीए’च्या आदेशांच्या पालनाबाबत तपासणी
शाळा आणि महाविद्यालयाबाबत ‘एफडीए’ने काढलेल्या आदेशांचे पालन अद्यापही होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही ठिकाणी असुरक्षित खाद्यपदार्थ मिळत तर नाही ना? जर असे असेल तर काय कारवाई होणार? किंवा या संदर्भात संबंधित शैक्षणिक संस्थांशी काही चर्चा सुरू आहे का? या प्रश्नावर बोलताना मुंढे म्हणाले की, ‘या संदर्भात आपण मंगळवारी शिक्षण विभागाचे आयुक्त, सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी आणि सर्व जिल्ह्यांतील ‘एफडीए’चे अधिकारी आणि सर्व जिल्हा परिषदांचे ‘सीईओ’ या सर्व अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक घेतली. त्यामध्ये काय कारवाई करायची आणि काय पावले उचलली पाहिजेत, याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता पुढच्या ८ ते १० दिवसांत याबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले असेल. काही ठिकाणी नियमांचे पालन होत नाही हे खरे आहे. त्याबाबत पुढील कारवाई होताना दिसेल’, असा इशारा त्यांनी दिला.
सेलिब्रिटींना होऊ शकतो १० लाखांचा दंड
‘विमल इलायची’च्या नावाखाली होणाऱ्या सरोगेट (अप्रत्यक्ष) जाहिरातींप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात सेलिब्रिटींना १० लाखांचा दंड होऊ शकतो असे म्हणत कारवाईला उशीर झाला तरीही कारवाई होणारच असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.