महाराष्ट्र

आभाळ फाटलं! राज्यात पावसाचे धुमशान; पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू

सोमवारी पहाटेपासून बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही राज्याला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी, सोलापूर कोल्हापूर, नांदेड आदी भागांना तर पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. सलग दुसऱ्या दिवशी बरसणाऱ्या पावसामुळे राज्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.

Swapnil S

मुंबई/ठाणे/सातारा/नाशिक : सोमवारी पहाटेपासून बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही राज्याला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी, सोलापूर कोल्हापूर, नांदेड आदी भागांना तर पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. सलग दुसऱ्या दिवशी बरसणाऱ्या पावसामुळे राज्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. मंगळवारी झालेल्या पावसाने मुंबईकराना पुन्हा आठवडाभर आधीच '२६ जुलै'ची आठवण करून दिली. राज्यातील १४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात गेल्या पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत ३०० मिमी, तर ठाण्यात २२५ मिमी रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. तसेच लोकलसह रस्ते आणि हवाई वाहतूक पूर्णपणे कोलमडल्याने सर्वसामान्यांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड पुण्याला बुधवारी 'रेड अलर्ट' तर सिंधुदुर्ग, नागपूर, गडचिरोली गोंदियात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यात अनेक ठिकाणी वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या. सततच्या पावसामुळे यंदा मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कुर्ला क्रांतीनगर परिसरात एनडीआरएफची यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती. परंतु पावसाचा धोका लक्षात घेता, या ठिकाणावरील ३५० नागरिकाचे स्थलांतर करण्यात आले. तर भूस्खलन होऊ शकणाऱ्या सुर्यानगर, विक्रोळी व खिंडीपाडा या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरम्यान, मंगळवारीही नेहमीप्रमाणे अंधेरी सबवेत पाणी साचल्याने सबवे बंद ठेवण्यात आला. अंधेरी, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, घाटकोपर, पवई, चेंबूर शेल कॉलनी, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, भांडुप, मानखुर्द, कुर्ला, हिंदमाता, परळ आदी सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाने मुक्काम ठोकला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडा, चंद्रपूर, नाशिक या भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. नांदेड जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा दुसऱ्या दिवशी बसला. अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्कराच्या टीम घटनास्थळी दाखल असून एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने योग्य कार्यवाही केली जात आहे. राज्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांसह घरांची पडझड, काही भागात जनावरे दगावली आहेत. राज्य सरकार प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पावसात अडकलेल्यांना राज्य सरकार योग्य ती मदत पोहोचवत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. नांदेड जिल्ह्यातील ढगफुटीसदृश स्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जनावरे दगावली. राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंगळवारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण परिस्थितीची माहिती घेऊन पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे, पिकांचे नुकसान आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची माहिती घेतली. आवश्यक तेथे राज्य आपत्ती प्रतिसादात दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत, अशा सूचना मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या.

मुंबई विमानतळावरील बसला आग

मुंबई विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला आग लागल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मंगळवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास डोमेस्टिक टर्मिनल टी-१ वर इंडिगो प्रवासी बसच्या पुढील भागाला आग लागली. विमानतळावर कार्यरत अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि काही वेळातच आग विझवण्यात आली. सुदैवाने या बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

राज्यात १४ लाख एकर पिकांचे नुकसान - मुख्यमंत्री

राज्यात १४ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, मात्र परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील मिठी नदीचा धोका वाढला असून सुरुवातीच्या काळात अनेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. मुंबईत तब्बल ३०० मिमी पाऊस पडला असून राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अलर्टवर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढग फूटफुटी सदृश परिस्थिती झाली. त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सातारा तालुक्यात पूरपरिस्थिती

सातारा तालुक्यात पूरपरिस्थिती असून पूल पाण्याखाली गेलेले आहेत. हामदाबाज ते किडगाव वेण्णा नदीवरील पूल, करंजे ते म्हसवे वेण्णा नदीवरील पूल, सातारा पुणे हायवेकडून मढ़ेंकडे जाणारा कृष्णा नदीवरील पूल हे तिन्ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. सदर पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पावसामुळे ८ विमानांचे मार्ग बदलले

खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. आठ विमानांचे मार्ग बदलून ही विमाने सूरत, अहमदाबाद आणि हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत. यामध्ये इंडिगोच्या ६, स्पाइसजेटच्या १ आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने आणि धावपट्टीवरील पाण्यामुळे विमानांच्या उड्डाण आणि उतरण्यात अडथळे निर्माण झाले. यामुळे प्रवाशांना तासंतास प्रतिक्षा करावी लागली, तर काहींना विमानतळावरच अडकून पडावे लागले.

बीडच्या गोदावरीला पूर

बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. माजलगावच्या गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी गावामध्ये शिरले असून गावांमधील मोरेश्वर मंदिर पाण्यासाठी गेले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबईसह रायगड, कोकणमध्ये शनिवारपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या मंगळवारपासून होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा २३ ऑगस्टला होणार आहेत.

महाराष्ट्रासह ६ राज्यात मान्सूनचे रौद्र रूप

वायव्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्याने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये २२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचे संकट आहे. याशिवाय ४०-५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मंगळवारी तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील सात दिवस मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि इतर भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

धरणे भरली, पाणीचिंता मिटली

राज्यात गेले दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. उजनी, राधानगरी, भाटघर, पांझरा, मुळशी आदी धरणे तुडुंब भरली आहेत, तर कोयना, जायकवाडी, भंडारदरा, धोम, खडकवासला आदी प्रमुख धरणांतील पाणीसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या या सर्व धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरू असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

राज्यातील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून धुवांधार बरसणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र आता पुरता खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रति ताशी ४५ ते ५० किमी राहणार असून तो प्रति ताशी ६५ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्य व्यवसाय विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. कोकण किनारपट्टीवर २२ ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

MMRDA ला अखेर जाग; मोनोरेलची प्रवासीक्षमता निश्चित; गाड्यांची तपासणी होणार

MIDC मधील झोपड्या ४ महिन्यांत हटवा; मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई पालिकेला आदेश

Mumbai : पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद; जैन समाजाची मागणी BMC कडून मान्य

विम्याचा हप्ता होणार कमी; आरोग्य-जीवनविम्याला GST तून वगळणार?