पूनम अपराज/मुंबई
राज्य पोलीस दलातील प्रशासकीय फेरबदलांचे सत्र सुरूच असून गुरुवारी गृह विभागाने राज्यातील ३८ वरिष्ठ आयपीएस (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये ७ विशेष पोलीस महानिरीक्षक (स्पेशल आयजी), ४ अप्पर पोलीस आयुक्त (ॲडिशनल सीपी) आणि २७ पोलीस उपायुक्त (डीसीपी) व पोलीस अधीक्षक (एसपी) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे तसेच एका पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अप्पर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त व डीआयजी दर्जाचे फेरबदल
नागपूरचे अप्पर आयुक्त शिवाजी राठोड यांची ठाणे येथे तर पुणे एटीएसचे (एटीएस) अप्पर आयुक्त प्रमोद शेवाळे यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विनीता साहू यांची मुंबईत राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) डीआयजीपदी नियुक्ती झाली आहे, तर या पदावर कार्यरत असलेले अशोक दुधे यांची ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. वायरलेस विभागाचे आर. राजा यांना पदोन्नती देऊन मुंबईच्या वायरलेस विभागातच अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मुंबई आणि ठाणे : मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे आणि बाळासाहेब पाटील यांची ठाणे शहर डीसीपीपदी बदली झाली आहे तर ठाणे ग्रामीणचे एसपी म्हणून विनय राठोड (पूर्वी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण) पदभार स्वीकारतील. नाशिक पोलीस अकॅडमीचे डीसीपी अकबर पठाण आणि प्रतीक्षेत असलेले दत्तात्रय कांबळे व शीला सेल यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ पातळीवरील महत्त्वाच्या बदल्या
नाशिक परिक्षेत्रात प्रशासकीय ट्विस्ट : नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांची अवघ्या काही दिवसांतच दादर (मुंबई) येथील व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष आयजी संजय येनपुरे यांची नाशिकचे नवीन पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नक्षलविरोधी अभियानातून नागपूर : नक्षलविरोधी अभियान विभागाचे विशेष आयजी संदीप पाटील यांची नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे.
महिला सुरक्षा विभाग : काही काळापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ अधिकारी शारदा राऊत यांची 'महिला अत्याचार प्रतिबंधक विभागा'च्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे आणि अमरावती : पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे विशेष आयजी पंजाबराव उगले यांची ठाणे शहर पोलीस दलात सह-पोलीस आयुक्त (जॉइंट सीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावतीचे विशेष आयजी रामनाथ पोकळे यांची मुंबईत नियोजन व समन्वय विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी महेश पाटील हे अमरावतीचे नवे आयजी असतील.