मुंबई : कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र यासाठी राज्यात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून, ६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरे, तर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असून, ते सलग १४ दिवस सर्वेक्षण करणार आहे.
या अभियानांतर्गत राज्यात १७नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी करण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक शुक्रवारी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व पालकमंत्र्यांना जिल्ह्यांच्या तसेच जिल्ह्याधिकारी व गावांच्या सरपंचांना पत्र लिहून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियानात जास्तीत जास्त कुष्ठरुग्णांचे निदान निश्चितीसाठी सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करुन आपल्या प्रभावी नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी या अभियानाचा सखोल आढावा घेतला आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत, प्रभावी आणि सर्व सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत सहज उपलब्ध असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून, कुष्ठरोग निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. घरोघर तपासणी करून समाजातील लपलेले, निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे व संसर्गाची साखळी खंडित करणे, कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती वाढवणे, 'शून्य कुष्ठरोग प्रसार' या ध्येयाच्या दिशेने वाटचाल मजबूत करणे, ही या अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत.
२०२४-२५ मध्ये ६२० नवीन रुग्णांचे निदान
२०२४-२५ या वर्षात महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ६२० नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी ९६ रुग्ण हे मुंबईत ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी वास्तव्य करणारे होते. सर्व रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहितीही पालिकेने दिली. कुष्ठरोगाचे असांसर्गिक व सांसर्गिक असे दोन प्रकार असून बहुविध औषधोपचार (MDT) पद्धतीने हा रोग पूर्णपणे बरा होतो. असांसर्गिक रुग्णांवर ६ महिने औषधोपचाराची तर सांसर्गिक रुग्णांवर १ वर्ष औषधोपचाराची आवश्यकता असते.