मुंबई : महाराष्ट्रातील भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी दोषींना सात ते दहा वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड, मालमत्ता जप्ती आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या परीक्षा सुधारणा समितीने केली आहे. समितीने आपला दुसरा अहवाल मंगळवारी राज्य सरकारला सादर केला.
वरिष्ठ आयएएस अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) उमेदवारांना परीक्षा शुल्क पूर्णपणे परत देण्याची शिफारस केली आहे. उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्यासाठी भरलेले शुल्कही आक्षेप योग्य ठरल्यास परत देण्याची सूचना समितीने केली आहे.
व्हेन्यू बँक तयार करण्याची शिफारस
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची आणि परीक्षा केंद्रांची स्वतंत्र माहिती प्रणाली अर्थात ‘व्हेन्यू बँक’ तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी या समितीने राज्य सरकारला अंतरिम अहवाल सादर केला होता. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी त्यात विविध उपाय सुचविण्यात आले होते.
कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत...
कठोर शिक्षेच्या शिफारशींबरोबरच एमपीएससीच्या गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील पदांची संख्या वाढवून १६ हजारांहून अधिक करण्याची तसेच सर्व भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची एकवेळ सवलत देण्याची शिफारस समितीने केली आहे. एमपीएससी परीक्षांमध्ये अनियमितता आणि गैरप्रकारांच्या आरोपांमुळे तसेच उमेदवारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ४ सप्टेंबर रोजी या समितीची स्थापना करण्यात आली होती.
हिवाळी अधिवेशनात विधेयक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी, परीक्षा केंद्रांची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि कायदा अधिक कठोर करण्यासाठी समितीने शिफारशी केल्याचे सांगितले. आगामी हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याचा आणि विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससी पेपरफुटी : विभाग अधिकारी मुख्य सूत्रधार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. आयोगातील विभाग अधिकारी (सहाय्यक विभाग अधिकारी) विश्वेश्वर नकाते यांना पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध तीन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. नकाते याच्याकडे प्रश्नसंच सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांनी प्रश्नसंचातील ३०० प्रश्न लॅपटॉपवर टाइप करून छापले आणि आयोगाचे उपसचिव अभिजीत लेंडवे यांना कार्यालयाच्या पार्किंगमध्ये दिल्याचा आरोप आहे.