महाराष्ट्र

राज्यसभेच्या ७ जागा बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले यांचे अर्ज दाखल, शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार आहे. सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार आहे. सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी होईल. अर्ज माघारीची मुदत ९ मार्च रोजी संपल्यानंतर सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली जाईल. विधानसभेतील कमी संख्याबळामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला राज्यसभा निवडणुकीत प्रथमच उमेदवार देता आलेला नाही.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांची लगबग सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भाजपच्या कोट्यातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे उमेदवार विनोद तावडे, माया ईवनाते, रामराव वडकुते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पार्थ पवार आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांच्या सोबत संबंधित पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार अनुपस्थित

सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी सज्ज झालेल्या शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात येणे शक्य नव्हते. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया त्यांनी ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानातून पूर्ण केली.

एकनाथ शिंदेंचा नेत्यांना धक्का

राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटात प्रचंड चुरस होती. गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे काही तास शिल्लक असताना शिंदे यांनी पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीची घोषणा करून इच्छुक नेत्यांना अनपेक्षित धक्का दिला.

काँग्रेसच्या ६ उमेदवारांची घोषणा

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी ६ उमेदवारांची नावे जाहीर केली. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि छत्तीसगडमधून फुलो देवी नेताम यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दोघेही सध्या राज्यसभा खासदार आहेत. पक्षाने हरियाणातून करमवीर सिंह बौद्ध आणि हिमाचल प्रदेशातून अनुराग शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तेलंगणाच्या दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वीम नरेंद्र रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे. तामिळनाडूमध्ये स्टालिन यांच्या द्रमुक पक्षाने काँग्रेसला एक राज्यसभा जागा दिली आहे. काँग्रेसने येथून एम. क्रिस्टोफर तिलक यांना उमेदवारी दिली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय