महाराष्ट्र

महाराष्ट्रातील रस्ते की मृत्यूचा सापळा? ६ वर्षात अपघातात ९५,७२२ जणांनी गमावला जीव, सर्वाधिक मृत्यू कोणत्या जिल्ह्यात?

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२५ या सहा वर्षांत राज्यात तब्बल ९५,७२२ लोकांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला आहे.

नेहा जाधव - तांबे

पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) भयंकर अपघात घडला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की प्रवाशांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. याआधी जळगाव येथे एक कार दुभाजकाला आदळल्याने गर्भवती महिलेचा गाडीतच जळून मृत्यू झाला. असे अपघात महाराष्ट्रात रोज घडत असतात. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२५ या सहा वर्षांत राज्यात तब्बल ९५,७२२ लोकांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला आहे.

वाहतूक विभागाची आकडेवारी

याच काळात २,१९,०३९ अपघात घडले असून ज्यात १,२९,६७० लोक गंभीर जखमी झाले आणि ५३,०३६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा आकडा फारच भयावह आहे. वाहतूक विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २६,९२२ अपघात घडले असून ११,५३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २६,७१९ अपघातांमध्ये ११,५७३ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला होता.

राष्ट्रीय पातळीवर, २०२३ मध्ये भारतात रस्ते अपघातांत १,७२,८९० लोकांचा मृत्यू झाला. त्यात १५,३६६ मृत्यूंसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता, तर तामिळनाडू पहिल्या आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होता.

या सहा वर्षांमध्ये २०२० मध्ये रस्ते अपघातांची संख्या कमी झाली. कारण या काळात कोरोनाच्या साथीमुळे वाहतुकीवर निर्बंध होते. मात्र, नंतरचे आकडे सातत्याने वाढत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात ५९ टक्के मृत्यू

या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान वाशिम जिल्ह्यात अपघातांमध्ये ३७ टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर धाराशिव (२७ टक्के), सोलापूर शहर (२६ टक्के) आणि सांगली (२५ टक्के) यांचा क्रमांक आहे. मृत्यूच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात ५९ टक्के वाढ झाली आहे. सांगली (५४ टक्के), सोलापूर शहर (५० टक्के), लातूर (३३ टक्के), भंडारा (३३ टक्के), छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (२९ टक्के) आणि अमरावती (२५ टक्के) यांचा उल्लेखनीय सहभाग आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईत सर्वाधिक १,८७८ अपघात घडले, तर नाशिक ग्रामीण जिल्हा मृत्यूच्या दृष्टीने आघाडीवर आहे, जिथे ६५६ अपघातात अनेक मृत्यू नोंदवले गेले.

अपघाताचे कारण

तज्ञांच्या मते, महामार्गांवरील अपघातांचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत रस्ते, रस्त्यावरील खड्डे, बेजबाबदारपणे वाहन चालवणे, चालकाचे अपुरे प्रशिक्षण आणि ओव्हरलोड वाहनांची वाहतूक. वाहतूक विभागाने अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाय राबवले तरी, अपघातांचे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू