मुंबई : सौर कृषिपंपांमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण करत देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’ची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने सौर कृषिपंपांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
देशात आतापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ (६४ टक्के) एकट्या महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये एकूण ५ लाख ६१ हजार ८१७ (३४ टक्के) कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. महाराष्ट्रानंतर हरयाणा १ लाख ९० हजार, राजस्थान १ लाख २७ हजार, उत्तर प्रदेश ७१ हजार ५३८, झारखंड ६१ हजार ४५२, गुजरात २१ हजार ८९४ अशी क्रमवारी आहे.
याआधी महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. त्याची नोंद डिसेंबर २०२५ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ १० टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांसाठी केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. सौरपंपाच्या पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होते. त्यामुळे आतापर्यंत १० लाखांवर शेतकऱ्यांची वीजबिलांमधून मुक्तता झाली आहे. तर दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळत आहे. यासोबतच शेतातील विद्युत अपघातांचा धोकाही टळला आहे. या सौर पॅनेल्समुळे सिंचनासह शेत घरातील विविध उपकरणे, मोबाईल चार्जिंग व ई-वाहन चार्जिंग करणेही सहज शक्य झाले आहे.