राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान 
महाराष्ट्र

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील पाच दिवस पावसाला पोषक हवामान राहणार असून, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस जोरदार गारपीटीचा इशार देण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्राच्या हवामानात अचानक बदल झाला असून राज्याच्या विविध भागात सोमवारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील पाच दिवस पावसाला पोषक हवामान राहणार असून, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस जोरदार गारपीटीचा इशार देण्यात आला आहे. दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीटीचा इशारा आहे. यासोबतच पुणे, सातारा, जळगाव, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे आणि ३० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानेवाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

राज्यात सोमवारी पुणे व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. . पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक पुणे शहर विशेषतः बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात बाणेर परिसरात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला.

वाशिम जिल्ह्यातही पाऊस

दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिसोड तालुक्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे बीजवाई कांदा, आंबा व फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. कापणीला आलेल्या पिकांनाही या पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

वादळी पावसाचे नवे सत्र होणार सुरू

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून ४ एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.

मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपीटीजी शक्यता?

३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रब्बी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन

त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पावसाचा अंदाज

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतही वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १ एप्रिलपासून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, बुधवारी संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर राहील. गुरुवारीही राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असून, शुक्रवारी मात्र ढगाळ हवामान राहील आणि पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, मंगळवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत गारपीटीचा अंदाज कायम आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. वाशिमच्या रिसोतालुक्यात आणि बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बीजवाई कांदा, आंबा, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.

Iran vs US-Israel War : ट्रम्प यांचा पुन्हा 'हल्लाबोल'; लवकर शांतता तह करा, अन्यथा, 'उद्ध्वस्त' करू- इराणला इशारा

नक्षलवाद संपवण्यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही; नक्षलींना गोळीला गोळीनेच उत्तर देऊ; लोकसभेत शहा यांचा प्रहार

भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला

मित्र कोण, शत्रू कोण गणित साधे कळले नाही

आजचे राशिभविष्य, ३१ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत